esakal | आज ठरणार पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर 
sakal

बोलून बातमी शोधा

आज ठरणार पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर 
  • भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार ठरणार; निवडणूक शुक्रवारी 

आज ठरणार पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजता महापालिकेची विशेष सभा होणार आहे. या पदासाठी सोमवारी (ता. 2) दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. सत्ताधारी भाजप कोणाला संधी देणार? याकडे लक्ष लागले असून विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रिंगणात उतरणार की बिनविरोध निवड होणार, हेही सोमवारीच स्पष्ट होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार तुषार हिंगे यांनी 14 ऑक्‍टोबर रोजी उमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप कोणत्या नगरसेवकाला संधी देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षपद आणि आठ दिवसांपूर्वी झालेल्या विषय समित्या अध्यक्षपद निवडणुकीप्रमाणे विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही की निवडणूक रिंगणात उतरणार, हेही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेनंतरच स्पष्ट होणार आहे. हिंगे यांची गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या विरोधात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजू बनसोडे यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. प्रभाग व विषय समित्यांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने भाजपचे सर्व समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी भाजपने शीतल शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या ऐनवेळी ते अनुपस्थित राहिल्याने हिंगे यांना उपमहापौरपदाची लॉटरी लागली होती. त्यापूर्वी 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपने अनुक्रमे शैलजा मोरे, सचिन चिंचवडे यांना संधी दिली होती. मोरे, हिंगे व शिंदे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागाचे आणि चिंचवडे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. आता कोणत्या मतदारसंघातील नगरसेवकाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे. वास्तविकता सत्ताधारी भाजप चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात विभागला गेला आहे. सध्या या दोघांच्या हातीच पक्षाची सुत्रे आहेत. महापौर चिंचवड मतदारसंघातील असून महत्त्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरी मतदारसंघातील नगरसेवकाकडे आहे. विषय समित्यांवर पिंपरी मतदारसंघातील नगरसेवकांना फार असे महत्त्व दिलेले दिसत नाही. त्यामुळे उपमहापौरपदाची संधी पिंपरी, चिंचवड व भोसरीपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाला मिळणार हे, सोमवारी दुपारी पाचनंतरच स्पष्ट होणार आहे.