मोठी बातमी : मावळातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

कोरोनामुळे गेली सहा महिने बंद असलेले भुशी धरणासह इतर धरण परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी अखेर खुली करण्यात आली आहेत.

लोणावळा : कोरोनामुळे गेली सहा महिने बंद असलेले भुशी धरणासह इतर धरण परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी अखेर खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ७ जूनपासून पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाणे असलेले लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंटसह मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भागातील ३१ पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील पर्यटनाचा गाडा बंद झाला होता. राज्य सरकारच्या वतीने मिशन बिगीन अगेन मोहिमेअंतर्गत लॉकडाउन हळूहळू शिथील करण्यात येत असल्याने पर्यटनावरील बंदी तत्काळ मागे घेत पर्यटन व पर्यटन उद्योगांवरील बंदी आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारच्या वतीने हॉटेल्स, रिसॉर्टस खुले केले. मात्र, पर्यटन स्थळांवरील बंदी कायम होती. सरकारने प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केल्याने लोणावळा, खंडाळ्यात शनिवार व रविवारी पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळाली. काही पर्यटकांनी खासगी बंगले, रिसॉर्टमध्येच राहणे पसंत केले, तर काही निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेले पर्यटक पर्यटन स्थळे बंद असल्याने माघारी फिरले. मावळातील पर्यटन बंदीमुळे लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले. ग्रामीण अर्थकारणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनावर आधारीत उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, मावळातील पर्यटनस्थळे खुली करावीत, अशी मागणी मावळ तालुक्यातील ग्रामीण व्यावसायिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आमदार सुनील शेळके यांनाही याबाबत निवेदन दिले होते. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी मावळातील धरण परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचे आदेश दिले. 

मावळातील अर्थकारण पर्यटनावर अवलंबून

मावळ निसर्ग संपदेने समृद्ध आहे. येथील अर्थकारण मावळच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना पर्यटन बंदी उठविल्याने दिलास मिळाल्याची प्रतिक्रिया व्यावसायिक प्रताप डिंबळे यांनी दिली. ऐन हंगामात पर्यटनास बंदी घातल्याने अनेकांचे व्यवसाय बुडाले, लहान-मोठे व्यावसायिकांवर संक्रांत आली. टुरीस्ट, टॅक्सी, रिक्शा चालकांचे आर्थिक संकट सोसावे लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector orders to open all tourist places in Maval taluka