esakal | पिंपरी-चिंचवडकरांनो, तुमच्या आजारपणाची माहिती डॉक्टरांना मिळणार एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडकरांनो, तुमच्या आजारपणाची माहिती डॉक्टरांना मिळणार एका क्लिकवर
 • महापालिकेची ई-हेल्थकार्ड प्रणाली उपयुक्त
 • वायसीएमच्या आंतररुग्ण विभागातही राबविणार 

पिंपरी-चिंचवडकरांनो, तुमच्या आजारपणाची माहिती डॉक्टरांना मिळणार एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गेल्यानंतर केस पेपर काढण्याची गरज नाही. संबंधित कर्मचाऱ्याकडे फक्त हेल्थकार्ड द्यायचे, आजारापणाबद्दल सांगायचे आणि टोकण घ्यायचे. ते घेऊन संबंधित डॉक्‍टरांकडे गेल्यानंतर आपली संपूर्ण माहिती त्यांना कॉम्युटरवर मिळालेली असते. त्यानुसार तपासणी करून औषधांची चिठ्ठी हातात मिळते. यामुळे रांगेत जास्त वेळ थांबावे लागत नाही. माझ्या दोन्ही मुलींच्या जन्मावेळी व अन्य आजारात हेल्थकार्डचा चांगला उपयोग झाला," रावेतमधील सपना तांबे बोलत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने पेपरलेस कारभारासाठी 2011 मध्ये वायसीएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासाठी 'ई-हेल्थकार्ड' योजना सुरू केली. त्याचे फायदे आता दिसू लागले असून, आंतररुग्ण विभागातील रुग्णांसाठीही योजना सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' प्रकल्प राबविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. परंतु, हा प्रकल्प केंद्र सरकारचा राष्ट्रीय डिजिटल हेल्थ प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याद्वारे देशाच्या आरोग्य विषयक सेवांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य विषयक डेटाबेस तयार होणार आहे. त्याचा उपयोग करून माहितीचे पृथक्करण करणे सोईस्कर होणार आहे. त्याचा उपयोग करून वैद्यकीय क्षेत्रास विविध संशोधन करणे शक्‍य होणार आहे. मात्र, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने (वायसीएम) 2011 पासूनच 'ई-हेल्थकार्ड' प्रणाली अमलात आणली असून, त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. 

ई-हेल्थकार्डचे फायदे 

 • रुग्णाचा आजार व डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधांची माहिती समाविष्ट 
 • रुग्णास कोणतीही कागदपत्रे जतन करावी लागत नाहीत 
 • वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध 
 • जास्तीत जास्त रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी व उपचार शक्‍य 

ई-हेल्थकार्डमध्ये काय असते 

 • रक्ताचे अहवाल, एक्‍स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय आदी अहवाल 
 • लॅबोरेटरी व विविध रेडिओलॉजी उपकरणांसोबत ई-हेल्थकार्ड प्रणालीचे इंटिग्रेशन 
 • रुग्ण तपासणीचे अचूक अहवाल तत्काळ प्राप्त 
 • अचूक निदान व तत्काळ वैद्यकीय उपचार करणे सोपे 

भविष्यातील नियोजन 

 • आंतररुग्ण विभागातील रुग्णांची माहिती ई-हेल्थकार्ड प्रणालीत समाविष्ट करण्याची सुविधा लवकरच 
 • रुग्णांना त्यांची आरोग्य विषयक माहिती डॅशबोर्ड सुविधेद्वारे घरबसल्या कधीही पाहता येणार 
 • उपचार अथवा पुनर्तपासणीसाठी येत असल्याची माहिती ई-मेल वा एसएमएसद्वारे देता येणार 
 • टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्येही ई-हेल्थकार्ड प्रणाली राबविण्यात येणार 

दृष्टिक्षेपात ई-हेल्थकार्ड 

 • एकूण बाह्यरुग्ण : 8,39,106 
 • देण्यात येणाऱ्या सेवा : 6,54,777 
 • एकूण चाचण्या : 53,44,271 
 • रेडिओलॉजी चाचण्या : 4,83,704 
 • डॉक्‍टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन : 20,60,565 
 • एप्रिल 2011 पासूनचे बाह्यरुग्ण : 38,25,686 
 • एकूण क्‍लिनिकल रिपोर्ट : 8,24,703 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 
ई-हेल्थकार्डमुळे वायसीएमच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची डिजिटल स्वरूपातील माहिती महापालिकेकडे उपलब्ध झाली आहे. तिचा उपयोग महापालिकेला वैद्यकीय योजना राबविण्यासाठी होत आहे. ही योजना टप्प्याटप्याने अन्य रुग्णालयांतही राबविण्याचा विचार आहे. 
- निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका 
 

loading image
go to top