
दोनशे शाळांत दुबार विद्यार्थी; अतिरिक्त शिक्षक सापडण्याची शक्यता
पिंपरी : शिक्षण विभागाकडून तब्बल सात वर्षांनंतर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत मात्र शहरातील २०५ शाळेत दुबार आधार कार्ड असलेले विद्यार्थी सापडले आहेत. परिणामी अतिरिक्त शिक्षक सापडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, या शाळांना आधार दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील उपस्थितीनुसार नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरलप्रणाली अंतर्गत ‘स्टुडंट पोर्टल’ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ही नोंद झाल्यानंतरच सर्व शाळांना संच मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे.
शहरात हे काम पूर्ण झाले असून, आकुर्डी उन्नत केंद्रातील तब्बल २०५ विद्यार्थी बोगस आढळले आहेत. एकाच विद्यार्थ्यांचे नाव दोन शाळांमध्ये किंवा वर्गांमध्ये नोंदविल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली असून, बोगस विद्यार्थी डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. ३० विद्यार्थ्यांच्या मागे १ शिक्षक या शासन नियमाचा विचार केला, तर या बोगस विद्यार्थ्यामागे तब्बल ११ अतिरिक्त शिक्षक ठरणार आहेत.
अशी होते विद्यार्थ्यांची पडताळणी
२१ सप्टेंबर रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन, सर्व जिल्ह्यासाठी याबाबतची माहिती असलेली एक्सेल शीट देण्यात आली. त्यानुसार ज्या शाळेत, वर्गात एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत. त्यांचे आधार कार्डची तपासणी करून, त्याची पडताळणी करण्यात आली. शिवाय हे विद्यार्थी नेमके कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहेत, याची शिक्षण विभागाच्या पथकामार्फत तपासणी केली गेली आणि ज्या अतिरिक्त वर्गात या विद्यार्थ्यांची नोंद केली गेली. ती दुबार नोंदणी जनरल रजिस्टर आणि स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्यात येणार आहेत. शहरातील अशा २०५ शाळांमधील विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी रद्द करण्यात येणार आहेत.