E-Bike Taxi : स्वस्त व जलद प्रवास होणार! ई-बाइक टॅक्सीचे नागरिकांकडून स्वागत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर बाइक टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा.
E-Bike Taxi
E-Bike Taxisakal
Updated on

- अविनाश ढगे

पिंपरी - राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर बाइक टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे स्वस्त आणि जलद प्रवास होणार असल्याने सर्वसामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, रिक्षा संघटनांनी बाइक टॅक्सी सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एक लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व शहरात ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. १) राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यात बाइक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात सुमारे तीन ते पाच हजार बाइक-टॅक्‍सीद्वारे प्रवासी सेवा दिली जात होती.

नागरिकही स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे बाइक-टॅक्‍सीला प्राधान्य देत होते. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे बेकायदेशीर आहे. तसेच महाराष्ट्रात बाइक-टॅक्‍सीला परवानगी नसल्यामुळे अवैध बाइक-टॅक्‍सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी वारंवार केली होती. त्या विरोधात आंदोलने केली होती.

काही रिक्षा संघटना न्यायालयात गेल्या होत्या. यावर उच्च न्यायालयाने बाइक टॅक्सी बंद करण्याचे आदेश जानेवारी २०२३ मध्ये दिले होते. त्यानंतर राज्यातील बाइक टॅक्सी सेवा बंद झाली. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बाइक टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याने तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

आजपासून आंदोलन

शासनाच्या धोरणामुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्‍न उभे राहणार आहेत. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये गुरुवारपासून (ता. ३) आंदोलनाची सुरवात केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत, आॅटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

काय होणार फायदा

  • एकट्या प्रवाशासाठी उपयुक्त

  • रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा स्वस्त

  • जलद वाहतूक सेवा

  • युवकांना रोजगार

  • काही रिक्षाचालकांच्या अरेरावीतून सुटका

  • विशिष्ट अंतरासाठी रिक्षापेक्षा सोयीस्कर

रिक्षा संघटनांच्या विरोधाची कारणे

  • खुल्या रिक्षा परवान्यामुळे अगोदर उत्पन्न कमी, आता बाइक टॅक्सीमुळे अजून उत्पन्न घटण्याची भीती

  • रिक्षा चालकांसमोर उदरनिर्वाह करणे अवघड होणार

  • खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मनाई असताना बाइक टॅक्सीला परवानगी का?

  • बाइक टॅक्सीच्या परवान्यांना बंधन नसल्यामुळे दुचाकींची संख्या वाढणार

बाइक टॅक्सीचा प्रवास

  • २७ नोव्हेंबर २०२० : केंद्र शासनाच्या समुच्चयकाची अनुज्ञप्ती (ॲग्रीगेटर परवाना) प्रसिद्ध करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

  • १६ मार्च २०२२ : खासगी कंपनीचा दुचाकी व तीनचाकी ॲग्रीगेटर परवाना मिळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अर्ज

  • १ एप्रिल २०२२ : कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता विहित कालमर्यादेत न केल्याने पुणे आरटीओने कंपनीचा अर्ज नाकारला

  • १२ एप्रिल २०२२ : खासगी कंपनीची उच्च न्यायालयात धाव

  • ६ सप्टेंबर २०२२ : बाइक टॅक्सीवर कारवाई करण्यासाठी रिक्षा संघटनांची परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासमवेत बैठक

  • २८ नोव्हेंबर २०२२ : बाइक-टॅक्‍सी सेवा पूर्णपणे बंद करण्यासाठी रिक्षा संघटनांचे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

  • २९ नोव्हेंबर २०२२ : ॲग्रीगेटर परवाना मिळण्यासाठीच्या अर्जाचा फेरविचार करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

  • ३० नोव्हेंबर २०२२ : दुचाकी व तीनचाकी टॅक्सी ॲग्रीगेटर परवाना मिळण्यासाठी खासगी कंपनीचा पुणे आरटीओत फेर अर्ज सादर

  • १९ नोव्हेंबर २०२२ : बाइक-टॅक्‍सी सेवा बंद करण्यासाठी रिक्षा संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  • २१ डिसेंबर २०२२ : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयान्वये खासगी कंपनीचा ॲग्रीगेटर परवाना मिळण्यासाठीचा अर्ज नाकारला.

  • १२ जानेवारी २०२३ : राज्यात बाइक टॅक्सी वाहनांचे ॲग्रीगेटर परवाना धोरण तयार करण्यासाठी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

  • १३ जानेवारी २०२३ : बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

  • २१ फेब्रुवारी २०२३ : बाइक टॅक्सी समुच्चयक धोरण विषयी प्रवासी वाहतूकदार संघटनांची बैठक.

राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ झाली आहे. एकट्या प्रवाशासाठी रिक्षा-टॅक्सीचे भाडे परवडत नव्हते. आता बाइक टॅक्सीमुळे प्रवाशांचा फायदा होईल.

- रमेश केदारे

रिक्षाचालक बऱ्याच वेळा जवळचे भाडे नाकारतात. तसेच मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. त्यांच्या मनाप्रमाणे भाडे घेतात. कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.

- अनिकेत लांडगे

दोन वर्षांपूर्वी पार्टटाईम काम म्हणून बाइक टॅक्सी चालवत होतो. त्यातून महिन्याचा खर्च निघायचा. पण, बाइक टॅक्सी बंद केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

- गणेश खरटमोल

बाइक टॅक्सीला परवानगीचा निर्णय रिक्षाचालकांच्या भाकरीत वाटेकरी निर्माण करणारा आहे. निर्णयाचा आम्ही निषेध करतो.

- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, संयुक्त कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com