
गौरी-गणपती देखाव्यातून समाज प्रबोधनाची ३० वर्षांची परंपरा आबाधित ठेवत थेरगावातील डॉक्टर दाम्पत्यांनी यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखावा साकारला आहे.
इको-फ्रेंडली गौरी-गणपती देखाव्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
वाकड - गौरी-गणपती देखाव्यातून समाज प्रबोधनाची ३० वर्षांची परंपरा आबाधित ठेवत थेरगावातील डॉक्टर दाम्पत्यांनी यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखावा साकारला आहे. एवढेच नव्हे तर येथील लाल किल्ल्यावर चक्क छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्वराजारोहन केले आहे. तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण देखील करण्यात आले आहे.
घरगुती टाकाऊ वस्तूंपासून साकारलेला हा पर्यावरणपूरक विशेष देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
थेरगाव, गणेश नगर येथील शिव कॉलनीत राहणारे डॉ. मंगल बोऱ्हाडे व डॉ. आबासाहेब बोऱ्हाडे या दाम्पत्यांनी हा देशभक्तीपर देखावा सादर करून सर्वांची वाहवा मिळवली आहे. दरवर्षी गौरी-गणपती सजावटीतून सामाजिक विषयांना हात घालण्यासाठी ते या परिसरात प्रसिद्ध आहेत. अवघा एक रुपया देखील खर्च न करता घरगुती व टाकाऊ वस्तू, साहित्याचा वापर करून त्यांनी हे हँड मेड डेकोरेशन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वजारोहण लाल किल्ल्यात पंत प्रधानांच्या हस्ते पार पडते त्याचप्रमाणे लाल किल्ल्याच्याप्रतिकृती समोर छत्रपती शिवाजी महाराज ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत.
शाम्पूच्या रिकाम्या बाटलीपासून शिवाजी राजांची हुबेहूब प्रतिकृती करून अंगावरील वस्त्रे, पागे देखील अत्यंत चपखलपणे साकारली आहेत. दोन्हीही गौरायांच्या हातात तिरंगा झेंडा आहे. त्या मागे तिरंग्यातील देशाचा नकाशा आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या फोटो फ्रेम करून त्यांच्या बलिदानाची अन त्यागाची आठवण करुन देण्यात आली आहे. पानांच्या पंत्रावळ्यापासून सुरेख मंदिर साकारले आहे त्यात श्री विराजमान झाले आहेत. हा देखावा साकारण्यासाठी डॉक्टर बोऱ्हाडे दाम्पत्य गेल्या पंधरा दिवसांपासून राबत होते.