
भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने डीपीमधून दिले जोड; दुरुस्तीची मागणी
भोसरी (पिंपरी-चिंचवड) : येथील गवळीमाथामधील ओव्हरहेड वीज केबल 2015 मध्ये भूमिगत केल्या होत्या. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर तीनच महिन्यात केबलमध्ये बिघाड झाला. सध्या डीपी बॉक्समधून वीज केबल घेतल्याने घरे व झाडांवर केबलचे जाळे तयार झाले आहे, असे स्थानिक रहिवासी तुषार ढोकले यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महावितरणने 2015 मध्ये गवळीमाथा भागात भूमिगत वीज केबल टाकल्या. मात्र, निकृष्ट दर्जाच्या केबल वापरल्यामुळे एका वर्षातच त्या नादुरुस्त झाल्या. त्यामुळे केबल दुरुस्ती न करता थेट डीपीमधून वीजजोड दिले. परिणामी घरे, वीजखांब आणि झाडांवर केबल जाळे तयार झाले आहे. यामुळे भूमिगत केबल केवळ नावालाच आहेत. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून महापालिकेचे स्वीकृत नगरसदस्य संजय वाबळे यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण यांच्यासह पाहणी केली. याशिवाय महावितरणचे कार्यकारी अभियंते राहुल गवारी यांच्याकडेही वाबळे यांनी निवेदन दिले.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रहिवासी दिलीप शिंदे म्हणाले, "माझ्या घरासमोरील झाडावरून केबल गेल्याने झाडावर केबलचे जाळे तयार झाले आहे. घराजवळील डीपीमधून काही वेळा गरम वाफा येतात. त्यामुळे भीती वाटते.'' रहिवासी संजय गवळी म्हणाले, "गवळीमाथामध्ये पूर्वी विजेचे खांब होते. त्यामुळे वीजजोड खांबावरून दिल्याने धोका कमी होता. मात्र, आता घरे व झाडांवर केबलचे जाळे तयार झाल्याने पावसाळ्यात विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे.''
गवळीमाथामध्ये डीपीमधून ओव्हरहेड केबल घेण्यात आल्याने काही ठिकाणी केबलची झाकणे उघडी आहेत. त्यामुळे लहान मुलांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता आहे. महावितरणने रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी उत्कृष्ट दर्जाच्या भूमिगत केबल टाकाव्यात.
- संजय वाबळे, स्वीकृत नगरसदस्य, महापालिका
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येत्या आठवड्यात भूमिगत केबल तपासणीसह कर्मचाऱ्यांद्वारे पाहणी केली जाईल. दुरुस्त व नादुरुस्त केबलचा शोध घेऊन त्याचा अहवाल महावितरणला सादर केला जाईल. केबलच्या दुरुस्तीबरोबरच नवीन केबलही भूमिगत टाकण्यात येतील.
- शिवाजी चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण