ऐन गणेशोत्सवात वीज होतेय गायब; दिघी, भोसरीत नागरिक हैराण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

  • दिघी, भोसरीत 48 तास वीज गायब
  • तीन वेळा ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड 

पिंपरी : दिघी रोड येथील गंगोत्री पार्क येथे ट्रान्सफॉर्मरचा तीन वेळा बिघाड झाल्याने तब्बल 48 तासांवर वीजपुरवठा खंडित झाला. वारंवार या भागात वीजपुरवठा विस्कळित होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सुसज्ज भागात वीज वाहिन्यांचे जाळे नागरिकांच्या डोक्‍यावर लटकलेले आहे. भूमिगत केबलचा विषय महापालिका व महावितरण यांच्या गोंधळात रखडल्याने नागरिकांना विविध समस्येला सामोरे लावे लागत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंगोत्री पार्क परिसराचा मोठा विस्तार झाला आहे. अधिकृत सोसायट्यांचे या भागात मोठे प्रमाण आहे. काही अनधिकृत बांधकामेही झाली आहेत. गुरुवारी (ता.20) सकाळी दहा वाजता वीज गायब झाली. ती शुक्रवारी (ता. 21) रात्री साडेदहा वाजता आली. शनिवारी सकाळी पुन्हा साडेनऊला वीज गेली. ती दुपारी आली. परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत नगरसेवक व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जमा झाले. 

असा उडाला गोंधळ 

दोन दिवसांच्या गोंधळात ट्रान्सफॉर्मरचे स्टॅंड तुटून पडले होते. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर बसवला तो लगेचच निकामी झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा आणला तो ही खराब झाला. पुन्हा तिसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मर आणल्यानंतर काम सुरळीत झाले. नागरिकांचे सुरू असलेले वर्क फ्रॉम होम ऐनवेळी ठप्प झाले. काही सोसायटीत क्वारंटाइन असलेल्या नागरिकांना दिवसभर पाण्याविना संघर्ष करावा लागला. पाचव्या व सातव्या मजल्यावरील नागरिकांनी हंड्याने पाणी भरले. तर बऱ्याच जणांनी वीज नसल्याने कार्यालयच बंद ठेवले. तीन ते चार तास केवळ इनव्हर्टरवर कामे सुरू राहू शकले. महावितरणचे अधिकारी राहुल गवारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रात्री दहा वाजता वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या भागात काही ठिकाणी हायटेंशनचा धोका आहे. भूमिगत केबलचे काम रखडलेले आहे. वारंवार महापालिका व महावितरण यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. मुंबईच्या धर्तीवर येथेही डक्‍टचे काम होणे अपेक्षित आहे. प्रथमच नागरिकांना वीज समस्येचा इतका वेळा संघर्ष करावा लागला आहे. 
- अजित गव्हाणे, नगरसेवक, भोसरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity disconnect in dighi, bhosari area