भोसरीत अर्ज करूनही वीज मीटर मिळेना, नागरिकांच्या तक्रारी

संजय बेंडे
Thursday, 20 August 2020

महावितरणने वीजमीटर घेणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, अर्ज केलेल्या काही नागरिकांची माहिती ऑनलाइन दिसत नाही.

भोसरी : महावितरणकडे वीज मीटर मिळविण्यासाठी काही नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरले. मात्र, मीटर देण्याची प्रक्रिया ही ऑफलाइनही सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज केलेल्या काही नागरिकांना उशिरा मीटर मिळत आहे. तसेच, एजंटाद्वारे काही पैसे घेऊन मीटर वितरित केले जात असल्याची तक्रार नागरिकांची आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महावितरणने वीज मीटर घेणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, अर्ज केलेल्या काही नागरिकांची माहिती ऑनलाइन दिसत नाही. त्यामुळे एकाच वेळेस अर्ज केलेल्या काही नागरिकांना वीजमीटर मिळाले, तर काहींना अद्यापही मिळाले नाहीत. तसेच, मीटर देण्यासाठी काही एजंट अर्ज केलेल्या नागरिकांद्वारे पैसे उकळत असल्याच्या तक्रारी दिघी परिसरातून होत आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज केलेल्या नागरिकांना डावलून ऑफलाइन अर्ज भरून व आगाऊ पैसे आकारून एजंटद्वारे मीटर बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मीटरसाठी रितसर अर्ज केलेल्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्यासह  दोघा मित्रांनी एकाचवेळी मीटरसाठी २३ मार्च रोजी ऑनलाइन अर्ज केला. त्यांची नावे ऑनलाइन दिसतात, तर माझे नाव दिसत नाही. त्यामुळे गोंधळून गेल्याची माहिती दिघीतील एका अर्जदाराने दिली. याशिवाय अधिक पैसे देऊन महावितरणकडे गेल्या दोन आठवड्यात दोनशे वीजमीटर आल्याची माहिती मिळत आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात मीटरचा तुटवडा झाल्याने ग्राहकांना काही पर्याय नव्हता. पण आता मीटर उपलब्ध असतानाही नागरिकांना नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरूनही वाट पहावी लागत आहे.

- वसंत रेंगडे, सामाजिक कार्यक्रर्ते, दिघी             

वीज मीटर हे अर्ज केलेल्या नागरिकांना प्राधान्यक्रमानेच दिले जातात. ज्या नागरिकांनी अगोदर अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना मीटर मिळाले नाही, अशांनी महावितरणकडे तक्रार करावी. तक्रारीची शहानिशा करून दोषींवर कारवाई केली जाईल. ऑनलाइन अर्ज नागरिकांनी व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यास अर्जदाराचे नाव दिसण्यास अडचणी येऊ शकतात. मात्र, नागरिकांच्या तांत्रिक अडचणी सुधारल्या जातील.

- राहूल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण भोसरी विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity meter not available for citizens after online application in bhosari