चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

मंगेश पाडे
Sunday, 29 November 2020

बोपखेल येथील घरफोडीत चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह चक्क अंडरवेअर, बनियानही चोरल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

पिंपरी : लोखंडी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातून साडे अकरा लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह अंडरवेअर व बनियानही चोरून नेले. ही घटना बोपखेलमधील गणेशनगर येथे घडली. 

अस्लम अल्लाबक्षी खान (वय 35, कॉलनी क्रमांक 19, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे घर 17 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरटे त्यांच्या घराचे मुख्य लोखंडी गेट व घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात शिरले. बेडरूममधील कपाटातून अकरा लाख 62 हजार 100 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे दागिने लंपास केले. यासह अंडरवेअर, बनियानचे तीन जोड व एक पेनही लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : जनतेच्या भावनांशी चालणारा खेळ थांबवा ! 
 
घरफोडी, दरोडा म्हटले की, किंमती वस्तू चोरीला गेल्या असणार हे गृहित धरलेले असते. चोरटेही चोरी करताना सोने-चांदीच्या दागिन्यांसह महागड्या वस्तूंवर डोळा ठेवतात. बहुतांश घटनांमध्ये दागिने चोरीला गेल्याचे समोर येते. दरम्यान, चोरटे कमी किंमतीच्या वस्तू चोरायच्या भानगडीत पडत नाही. मात्र, बोपखेल येथील घरफोडीत चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह चक्क अंडरवेअर, बनियानही चोरल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven and a half lakh jewelery has been stolen in Pimpri