भोसरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेजवळील रस्त्याच्या पदपथावर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

भोसरीतील आळंदी रस्त्यावरील पदपथ मुळातच अरुंद आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी विविध विक्रीच्या वस्तू पदपथावर ठेवल्या आहेत. पीसीएमसी चौक ते लांडेवाडीतील अग्निशमन केंद्रापर्यंतच्या दोन्ही बाजूकडील पदपथावर टपऱ्या, पत्रा शेड उभारण्यात आले आहेत.

भोसरी (पिंपरी चिंचवड) : भोसरीतील पीसीएमसी चौक ते लांडेवाडी अग्निशमन केंद्रापर्यंतच्या पदपथावर टपऱ्यांचे अतिक्रमण झाल्याने मुख्य रस्त्याने पायी चालावे लागते. याच रस्त्याने पीएमटी बस आणि रिक्षांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्याचप्रमाणे खासगी प्रवासी वाहनांमुळे मुख्य रस्त्याने जाताना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याची कैफीयत राहुल निमगावे हे पादचारी व्यक्त करत होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

भोसरीतील आळंदी रस्त्यावरील पदपथ मुळातच अरुंद आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी विविध विक्रीच्या वस्तू पदपथावर ठेवल्या आहेत. पीसीएमसी चौक ते लांडेवाडीतील अग्निशमन केंद्रापर्यंतच्या दोन्ही बाजूकडील पदपथावर टपऱ्या, पत्रा शेड उभारण्यात आले आहेत. भोसरीतील दिघी रस्त्यावर काही भागात पदपथ नाही. असलेल्या पदपथावर विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसते. भोसरी एमआयडीसीतीलही मोक्याच्या रस्त्याच्या पदपथावर टपऱ्या उभारण्याचे काम सुरू आहे. इंद्रायणीनगरातील मिनी मार्केटजवळील पदपथावरही विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. यामुळे भोसरीतील पदपथ म्हणजे पादचाऱ्यांसाठी नसून विविध व्यवसाय करण्यासाठीच उभारण्यात आल्याची शंका सुभाष माचरे या कामगाराने व्यक्त केली. भोसरीतील पीएमटी चौक, दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क आदी भागातही अनधिकृत टपऱ्या आणि पत्रा शेडचे पेव फुटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील मोकळी जागा आहे. ही जागा पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दर्शनीभागात आहे. दोन वर्षापूर्वी टपरीधारक आणि पत्राशेडने ही जागा व्यापली होती. या ठिकाणी काही जणांकडून टपऱ्या आणि पत्राशेड उभारुन भाड्याने दिल्या होत्या. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. महापालिकेने त्यावेळी कारवाई करत या टपऱ्या काढून टाकल्या होत्या. त्याचप्रमाणे पुन्हा येथे टपऱ्या उभारु नये, यासाठी तारेचे कुंपणही टाकले होते. मात्र आता हे तारेच कुंपण गायब झाले आहे. हळूहळू पुन्हा काहीजणांकडून टपरी उभारुन या जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

जागाही फुकट आणि वीजही !

भोसरीतील विविध पदपथावर उभारण्यात आलेल्या पदपथावरील टपऱ्यांवर आणि पत्राशेडमध्ये महापालिकेची वीजही चोरून वापरण्यात येत आहे. त्यामुळे फुकटच्या महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि पत्राशेडमध्ये वीजही फुकटच वापरली जात आहे. तरीही महापालिका आणि महावितरण याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

             
भोसरी परिसरात वाढत्या टपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आताच आळा बसविला पाहिजे. भोसरीची वाढती लोकसंख्या पाहता ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील दहा वर्षात भोसरीचा बिहार होण्याची शक्यता आहे.
- योगेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते

भोसरीतील पदपथावरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील टपऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा या ठिकाणच्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
-अवधूत तावडे, इ क्षेत्रीय अधिकारी, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on the sidewalk near krantijyoti savitribai phule school at bhosari