सरकारच्या परवानगीने उद्योग सुरूही झाले; पण 'ही' चिंता काही पाठ सोडेना...

सरकारच्या परवानगीने उद्योग सुरूही झाले; पण 'ही' चिंता काही पाठ सोडेना...

पिंपरी : लॉकडाउन सुरू असताना राज्य सरकारने उद्योगनगरीतील कंटेन्मेंट झोन सोडून उर्वरित भागातील उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी कामगारांना कामावर आणायचे कसे, ही अडचण आता उद्योजकांना सतावू लागली आहे. 

उद्योगांना परवानगी देताना त्यामध्ये कामगारांची ने-आण करणाऱ्या गाडीचा क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पोर्टलवर परवानगीचा अर्ज भरत असताना त्यामध्ये गाडीचा क्रमांक टाकल्याखेरीज फॉर्म पुढे जात नाही. त्यामुळे काही उद्योजकांना नाइलाजाने त्यामध्ये स्वताच्या गाडीचा क्रमांक द्यावा लागत आहे. या समस्येमुळे उद्योजकांना कामगारांना पिकअप करण्यासाठी तीन-चार तास खर्च झाले, तर काम कधी करायचे, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्य सरकारने उद्योगनगरीतील उद्योगांना परवानगी देताना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कामगारांना दुचाकीचा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी उद्योजकांनी त्यांना वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरातील काही लघुउद्योजकांकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी अधिक आहे. मात्र, त्याचा विचार करता यांच्यासाठी मोठ्या बसची सुविधा उपलब्ध करून देणे, हे आताच्या घटकेला या उद्योजकांना परवडणारे नाही. गेल्या दीड महिन्यांपासून उद्योग बंद असल्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. त्यामध्ये वाहतुकीची सुविधा कशी द्यायची, असा प्रश्‍न काही उद्योजकांनी उपस्थित केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेने एमआयडीसीमध्ये कामासाठी येणाऱ्या कामगारांच्या सोयीसाठी पीएमपीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे, त्यासंदर्भातील निवेदन आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना देखील देण्यात आले आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे उद्योजकांसमोरील अडचणीत भर पडली आहे. 

उद्योजक म्हणतात...

एमआयडीसी परिसरात असणाऱ्या लघुउद्योजकांची संख्या मोठी आहे. सध्याची बाजारपेठेतील आर्थिक परिस्थिती पाहाता या उद्योजकांना कामगारांची ने-आण करण्यासाठी व्यवस्था करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे उद्योग विभागाने कामगारांना ये-जा करण्यासाठी दुचाकीची परवानगी द्यावी किंवा फक्‍त कामगारांसाठी पीएमपी बसची सुविधा करावी, असे उद्योजक प्रमोद राणे यांनी सांगितले. 

शहरातील अनेक भागांमध्ये दुचाकीवरुन ये-जा करणाऱ्या मंडळींचे प्रमाण वाढले आहे, असे असताना एमआयडीसीमध्ये कामासाठी येणाऱ्या कामगारांना दुचाकीवर न येण्याचे बंधन घालणे जाचक आहे. छोट्या उद्योगांमध्ये कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी निगडीला, भोसरीला, पिंपरीला राहायला आहेत. त्यांना घेण्यामध्येच तीन ते चार तासाचा वेळ गेला, तर काम कधी सुरू करायचे आणि कधी संपवायचे, असा सवाल उद्योजक समीर पेठकर यांनी उपस्थित केला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com