पिंपरी-चिंचवडकरांनो, आवास योजनेच्या अर्जासाठी मिळालीय मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

शहरी गरीब निर्मूलन व 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेची (पीएमएवाय) घोषणा केली आहे.

पिंपरी : शहरी गरीब निर्मूलन व 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेची (पीएमएवाय) घोषणा केली आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडीत स्वस्त दरात उत्तम प्रतिची घरे उभारण्यात येत आहेत. सर्व सामान्यांना परवडतील, अशी ही योजना असून त्यासाठी अर्ज स्वीकृती सुरू आहे. बॅंकांना सलग सुट्या असल्याने 10 ऑक्‍टोबरपर्यंत या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्यायोग्य अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले जात आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकृतीकरिता 2 ऑक्‍टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी पाच हजार रुपयांचा डीडी आवश्‍यक असल्याने बॅंकांच्या सलग येणाऱ्या सुट्यांमुळे डीडी वेळेत मिळणे अवघड होतं आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी, तक्रारी वाढल्याने नागरिकांच्या व विविध संघटनांच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीची मुदत 10 ऑक्‍टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असलेले नागरिक लॉटरी आधारित प्रणालीमार्फत बाजारपेठेतील किमतीपेक्षा कमी किमतीत 1 बीएचके सदनिका (फ्लॅट) या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे, असेही महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extension for housing scheme application till 10th october