
पिंपरी : पिंपरी येथे शगुन चौकात एका महिला वाहतूक पोलिसाने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याबाबतचा कसुरी अहवाल वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी गुरुवारी (ता. 17) वरिष्ठांकडे सादर केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी वाहतूक विभागात कार्यरत असलेली एका महिला वाहतूक पोलिस शगुन चौकात इतर सहकाऱ्यांसोबत ड्यूटीवर होती. तिथे एका दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित महिला वाहतूक पोलिसाने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तडजोड झाली. त्यानुसार पोलिस महिलेने वेगळ्या पद्धतीने ती रक्कम स्वीकारली. एका तरुणीने वाहतूक पोलिस महिलेच्या पॅन्टच्या मागील खिशात पैसे ठेवले आणि पोलिस महिलेने ते स्वीकारले. दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ शहरात जोरदार व्हायरल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांनी या महिलेचा कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
संबंधित पोलिस महिलेचा कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. पुढील निर्णय वरिष्ठ घेतील. दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.
- श्रीकांत डिसले, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा