लालपरीची चाके धावू लागली, पण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

-एसटीची चाके रुतलेलीच
-मोक्‍याचे सिझन हुकले : कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका

पिंपरी : लॉकडाउननंतर प्रथमच वल्लभनगर आगारात 5 ऑगस्टपासून लालपरीची चाके धावू लागली आहेत. मात्र, ही चाके अद्यापही गाळात रुतलेलीच आहेत. दररोजच्या बुकींगनुसार व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आगारातून गाड्या सोडल्या जात आहे. सध्या 45 गाड्या मार्गावर धावत असून आर्थिक उत्पन्नाअभावी अडीचशे चालक-वाहक व कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. महिन्याकाठी तब्बल 11 लाखाचे उत्पन्न हजारोवर येऊन ठेपले आहे. ऐन सुट्ट्यांचा हंगाम हातातून निघून गेला असून एक महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगारात हंगामाच्यावेळी पाय ठेवायलाही जागा उरत नाही. स्थानक कायम गजबजलेले असते. शहरातून महाराष्ट्रभरात एसटीचा प्रवास सुरु असतो. सध्या कोल्हापूर, नाशिक, कोकण, रत्नागिरी व महाड या ठिकाणी एसटीची सेवा सुरु आहे. एसटीमध्ये 22 प्रवाशांची क्षमता आहे. परंतु 18 ते 20 प्रवासी आल्यासही गाडी बुकींग केले जात आहे. सध्या चालक-वाहक 125 व कर्मचारी मिळून 250 जण आहेत. सध्या ग्रुप बुकींगवर भर दिलेला आहे. एमएसआरटीसी या ऑनलाइन पोर्टलवर व ऍपवर बुकींग सुरु आहे. मालवाहतूक देखील सुरु झाली आहे. चार ट्रकच्या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यात घरोघरी सुविधा पुरवीली जात आहे. वाहने पूर्णपणे बंदीस्त करुन सॅनिटाइज केली जात आहेत. त्यामुळे यामाध्यमातूनही आगाराला उत्पन्नाचा हातभार लागत आहे. 

ऐन हंगाम हुकला- मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या गेल्या. आगारात सर्वांत मोठी वर्दळ या हंगामात असते. तसेच पंढरपूर यात्रा, कोकण उत्सव, आळंदी यात्रा या मोक्‍याच्या उत्सवात गाड्या बंद राहिल्या. यामाध्यमातून एसटीला सर्वांत मोठे उतन्न अपेक्षित असते. ऐन हंगामात बसही अपुऱ्या पडतात अशी परिस्थिती इतर वेळी ओढावते. तसेच ठिकठिकाणच्या गावजत्रा, लग्नसराई, पर्यटनस्थळही लॉक झाल्याने त्याचाही फटका एसटीला बसला आहे. तब्बल चार कोटींच्या आसपास उत्प्न्नावर पाणी पडले आहे. मात्र याउलट परिस्थिती सध्या आहे. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे 25 टक्के पगार कपात सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एसटीची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. आगारात प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. सध्या चालक-वाहक यांना रोटेशन पद्धतीने कामाच्या नेमणुका दिल्या आहेत. योग्य खबरदारी घेऊन सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे. -पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर.

( Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial blow of crores of rupees to ST