शैक्षणिक संस्थाचालक म्हणतायेत, 'खर्च भागवायचा तरी कसा?' 

आशा साळवी
Sunday, 6 September 2020

संस्थांचालकांसमोर अनेक समस्या; पालकांना टप्प्याने शुल्क भरण्याची विनंती

पिंपरी : कोरोनामुळे यंदा अनेक खासगी शैक्षणिक संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शुल्क थकबाकीमुळे शाळा कशा सुरू ठेवायच्या, शिक्षकांचे पगार कसे करायचे, मालमत्तेची देखभाल कशी करायची, असे अनेक प्रश्‍न शैक्षणिक संस्थांसमोर उभे ठाकले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी काही स्वतः:च्या मालकी जागेवर, तर काही भाडेतत्त्वावर इमारती बांधून सुरू आहेत. सरकारच्या निर्णयानुसार यंदा शैक्षणिक शुल्कात वाढ करता येणार नाही. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या बचावापासून पायाभूत सुविधांसह आता स्वच्छतेचा खर्चही वाढणार आहे. शाळा बंद असली, तरी इमारतीची देखभाल, साफसफाई, वीजबिल, पाणीबिल, बॅंकांचे हप्ते हे सर्व खर्च सुरूच आहेत. त्यात ऑनलाइन शाळा सुरू असल्याने संगणक, इंटरनेट, प्रत्येक वर्ग सॅनिटाईज करणे हे खर्चही वाढले आहेत. 

संस्थाचालक म्हणताहेत... 

शाळा बंद असली, तरी खर्च थांबलेला नाही. या कोरोना काळात सरकारने कुठल्याही खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेला मदतीचा हात दिलेला नाही. पालकांनी संस्थेचा विचार करून शुल्क भरणे गरजेचे आहे. एका शाळेवर शिक्षक, वाहनचालक, शिपाई यांचाही उदरनिर्वाह अवलंबून आहे. 
- धनंजय वर्णेकर, संस्थापक, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड 

सक्षम पालक शुल्क भरत नाही. शुल्क जमा झालेच नाही; तर शाळेचा खर्च व शिक्षकांचा पगार कसा करायचा? प्रत्येक शिक्षकांना इंटरनेट सेवा पुरवावी लागत आहे. पालकांनी हप्त्यांमध्ये शुल्क भरले, तरी चालू शकेल. असेच काही दिवस सुरू राहिले, तर शैक्षणिक संस्था बंद पडतील. 
- राजेंद्र सिंह, संस्थापक, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी-इंद्रायणीनगर 

पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावला जात नाही. त्यांनी संस्थांचाही सहानुभूतिपूर्वक विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आता भरमसाट वीजबिल आले आहे. तुमच्या इच्छेने शुल्क द्या, अशी पालकांना विनंती केली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळेना. त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. 
- जगन्नाथ काटे, संस्थापक, पी. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर 

अनेक संस्थाचालक कर्ज काढून शाळा चालवीत आहेत. बॅंकांचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे पालकांनी स्वतः:हून टप्प्याने शुल्क भरले तरी चालेल. यावर्षी संस्थांचे 50 टक्के नुकसान झाले आहे. वेतन व पायाभूत सुविधांवरचा खर्च जमा असणाऱ्या शुल्कातूनच केला आहे. 
- डॉ. डी. के. भोसले, संस्थापक, एसएनबीपी स्कूल, पिंपरी 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • यंदा शुल्कात वाढ नाही; मात्र, थकबाकी मिळेना 
  • शाळांचे 50 टक्के आर्थिक नुकसान 
  • संगणक, इंटरनेट, सॅनिटाइजचा खर्च वाढला 
  • पालकांनी टप्प्याने शुल्क भरावे 
  • शाळा बंद, तरी इतर खर्च सुरूच 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial dilemma of educational institutions in pimpri chinchwad