
टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : मावळात गेल्या दोन आठवड्यांत वणवा लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात पवन मावळातील बऊर डोंगर, नाणे मावळातील नाणे-नाणोली डोंगर व माळरान, आंदर मावळातील कुसूर पठारावर लागलेल्या वणव्यामुळे पठारावरील संपूर्ण रान जळाले असून, वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. पठारावरील सर्व चारा जाळून खाक झाल्याने तिथे राहणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आठ महिन्यांच्या घुसमटीनंतर पर्यटकप्रेमींना सहलीचे लागले वेध; कोणत्या ठिकाणांना पसंती पहा
मावळ भागातील अनेक शेतकऱ्यांकडील जनावरे माळरानावरील व डोंगरातील गवतावर अवलंबून आहे. माळरानावरील, डोंगरातील व पठारावरील गवत हे जनावरांचा वर्षभराचा चारा असतो. मात्र, कुसूर पठारावर लागलेल्या वणव्यात पठारावरील चारा जाळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वणव्यामुळे अनेक जंगली वनस्पतींची हानी झाली असून, लाखो पक्षी बेघर झाले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वणवे लागू नये म्हणून मोठमोठ्या मोहिमा उभारल्या पाहिजे. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन असे वणवे लावणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
माझ्याकडे ३२ गाई, वासरे असून, सर्व जनावरे पठारावरील चाऱ्यावर अवलंबून आहेत. वणवा लागल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, मग जनावरांना खाण्यासाठी चारा कोठून आणणार? दानशूर व्यक्तींनी गाईंच्या चाऱ्यासाठी मदत करावी.
- कोंडिबा आखाडे, शेतकरी, कुसूर
वावरात ठेवलेला गवत पेंढा वणव्यात जळून खाक झाला. मावळातील वणवे मुक्या जनावरांच्या पोटावर उठले की काय?
- अनंता आंद्रे, नाणे