Pimpri-Chinchwad : दत्तवाडी येथे नेरेत जागेच्या वादातून गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Crime News : दत्तवाडी येथे नेरेत जागेच्या वादातून गोळीबार

पिंपरी : नेरेतील दत्तवाडी येथे जागेच्या वादातून तरुणावर गोळीबार केल्याने यामध्ये तरुण जखमी झाला. तर तरुणाचे वडील, चुलते व चुलत भाऊ यांना बेदम मारहाण केली. येशू लुटेरा मारवाडी (वय २८, रा. शिव कॉलनी, नेरे, दत्तवाडी ) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विकास राजपूत (रा. भोसले वस्ती, माण), कार्तिक ठाकूर (रा. आकुर्डी), पृथ्वीराज राठोड (रा. चाकण), ज्ञानेश्वर राजपूत (रा. वाडेबोल्हाई ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा चुलत पुतण्या विकास हा जागेच्या वादातून इतर आरोपींसह फिर्यादीच्या घरी आले. फिर्यादीसह त्यांचे चुलते नागू मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी याना शिवीगाळ केली.

दरम्यान, फिर्यादी त्यांना समजवण्यासाठी जात असताना विकास याने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या हाताला घासून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. नंतर फिर्यादी हे स्वतःला वाचवण्यासाठी घरात लपले असता इतर आरोपीनी फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ व वडिलांना दगड मारले.

तसेच आरोपी विकास याने पुन्हा घराजवळ येऊन पत्राच्या शेडवर गोळी झाडली. त्यानंतर फिर्यादी याना 'आता वाचलास , तुला माहित आहे का माझ्यावर किती गुन्हे आहेत, पुन्हा सोडणार नाही' अशी धमकी दिली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.