Breaking : पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढला, आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

- शहरातील एकूण मृतांची संख्या 53 

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्यात हा आकडा वाढतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण, एक जुलैला सुदैवाने कोणाचाही बळी गेला नाही. मात्र, दोन जुलैला एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आज तीन जुलै रोजी दुपारी एकपर्यंत पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 53 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी शहरात आढळला. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन हजार 708 झाली होती. रुग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करूनही संख्या वाढते आहे. सुरुवातीला सोसायट्यांत झालेला संसर्ग आता झोपडपट्ट्या, चाळी व दाट लोकवस्तीत शिरला आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागातच सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. 

आकडे बोलतात 

  • 11 मार्च ते 31 मे : 11 मार्च ते 31 मे या 82 दिवसात 566 रुग्ण आढळले होते. या कालावधीत अवघ्या आठ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एकही मृत्यू झाला नव्हता. एप्रिलमध्ये तीन व मे महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. 
  • जून : जून महिन्यात 3003 रुग्ण वाढले, तर 39 जणांचा मृत्यू झाला. 
  • जुलै : जुलै महिन्यात तीन जुलै, शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्थात अडीच दिवसांत 705 रुग्ण वाढले. पाच जणांचा मृत्यू झाला. 

दृष्टिक्षेपात वायसीएम 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वायसीएमला कोविड रूग्णालय घोषित केले आहे. आजपर्यंत मृत्यू झालेल्या 53 पैकी 33 जणांचा वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे. अन्य 20 रुग्णांचा मृत्यू शहरातील खासगी व शहराबाहेरील रुग्णालयांत झाला आहे. वायसीएमचा विचार केल्यास एप्रिलमध्ये दोन, मे महिन्यात तीन, जून महिन्यात 23 आणि जुलै महिन्यात पाच अशा 33 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी दुपारी एकपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण तीन हजार 708 होते. पैकी बरे झालेली रुग्णसंख्या दोन हजार 189 झाली आहे. सध्या एक हजार 466 जण उपचार घेत आहेत. एकूण 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी एकपर्यंत नवीन 50 रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराबाहेरील रहिवासी मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयात आजपर्यंत 283 जणांनी उपचार घेतले आहेत. त्यातील 197 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या 86 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 32 जणांचा मृत्यू झालेला आहे. 

मृत्यूची कारणे 

प्रतिकार शक्ती कमी असलेले, फुफ्फूस, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय, काही रुग्ण मृत्यू होण्यापूर्वी अवघे काही तास अगोदर रुग्णालयात दाखल झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five deaths in Pimpri-Chinchwad till 1 pm today