पिंपरी-चिंचवड शहरात पंधरा दिवसांत पाच खून; मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

आयुक्तालयाच्या हद्दीत लागोपाठ घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे शहर हारदले आहे. पाचपैकी तीन खून डोक्‍यात दगड घालून, गळा चिरून निघृण पद्धतीने केल्याचे समोर आले आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत खुनाच्या पाच घटना घडल्या असून, तीन गुन्ह्यांतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दोन मृतांची तर ओळखच पटलेली नाही. 

आयुक्तालयाच्या हद्दीत लागोपाठ घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे शहर हारदले आहे. पाचपैकी तीन खून डोक्‍यात दगड घालून, गळा चिरून निघृण पद्धतीने केल्याचे समोर आले आहे. दोन घटनेतील मृतांची अद्याप ओळखच न पटल्याने आरोपींचा शोध घेणे तर दूरच अशी स्थिती आहे. ८ फेब्रुवारीला तळेगाव दाभाडे ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे येथील स्टेडियमजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाचा डोक्‍यात दगड घालून खून केल्याचे समोर आले. मात्र, मृताची ओळख पटलेली नसून, आरोपींचाही शोध लागलेला नाही. अशीच घटना चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्हेकरवाडीत १२ फेब्रुवारीला घडली. साधारण वीस वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केला आहे. मात्र, या मृताचीही ओळख पटलेली नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१२ फेब्रुवारीला देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे चाकण रोडवरील तळवडे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रोडवर डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आला. जमिनीच्या वादातून हा खून केल्याचे समोर आले असून, गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले आहे.  

तसेच हिंजवडी येथे चार फेब्रुवारीला शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यासह पिंपरीतील चिटफंड व्यावसायिकाचे चाळीस लाखांसाठी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अपहरण केल्यानंतर व्यावसायिकाला ठिकठिकाणी फिरविले. पैसे मिळताच त्यांचा खून केल्यानंतर रायगडमधील महाड येथे शनिवारी (ता. ६) त्यांचा मृतदेह आढळला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान 
गहुंजे येथील घटनेला आठ दिवस, तर चिंचवडमधील घटनेला चार दिवस उलटूनही मृतांची ओळख पटलेली नाही. या घटनेतील तरुणांचा डोक्‍यात दगड घालून, तसेच गळा चिरून खून केला आहे. मृतांची ओळख पटविण्यासह आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five murders in fifteen days in Pimpri-Chinchwad city