#PuneRains : पिंपरी-चिंचवडमधील रस्ते पाण्याखाली, घरांमध्येही शिरले पाणी

पीतांबर लोहार
Thursday, 15 October 2020

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचले. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचले. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. गुरुवारी दुपारी बारापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यामुळे नोकरदार व कामगारांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आकुर्डी- प्राधिकरणातील संजय काळे सभागृह परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. बहुतांश सोसायट्यांच्या पार्किंगमध्येगही पाणी शिरलेले होते. रस्त्यांच्या कडेला उभ्या वाहनांची अर्धी चाके पाण्यात होती. ही स्थिती दुपारी बारापर्यंत होती. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे सामाहिक कार्यकर्ते सुभाष राणे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन परिसरातील एम्पायर इस्टेट सोसायटीच्या रो-हाऊस परिसरात पाणी शिरले होते. मोरवाडीकडून आलेला व पवना नदीला मिळालेला नाला, या सोसायटीजवळून जातो. नाल्याची सीमाभिंतीला खिंडार पडल्याने नाल्याला आलेल्या पुराचे पाणी सोसायटीच्या आवारात शिरले. दुपारी बारापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनकरून माहिती दिली, तरीही कोणी आले नसल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बहुतांश सोसायट्या व व्यापारी इमारतींचे पार्किंग तळघरात आहेत. अशा ठिकाणीही पाणी शिरले आहे, अशी स्थिती एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील एका व्यापारी इमारतीत होती. तसेच, पुणे-मुंबई महामार्गालगतच बी झोन इमारत आहे. तिच्या वाहनतळातही पाणी शिरले होते. शेजारील नाल्याचे पाणी पाझरून वाहनतळात आले होते. त्यामुळे वाहनतळ वाहनांसाठी बंद ठेवले आहे. 

रस्त्यांवरही पाणी 

निगडी-भोसरी स्पाइन रस्त्यावर संत नगर चौक, कुदळवाडी भुयारी मार्गावर पाणी साचले आहे. चऱ्होलीगाव ते निरगुडी रस्त्यावरही पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे. मोरवाडीतील सम्राट चौकात पाणी साचले आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर ताथवडेतील पवारवस्ती भुयारी मार्ग, पुनावळेतील भुयारी मार्ग, इंदिरा कॉलेजजवळी भुयारी मार्ग, वाकडमधील भुजबळ चौक भुयारी मार्गातही पाणी साचले आहे. भोसरी गावठाण, आदिनाथनगर, शांतीनगर, धावडेवस्ती, जुनी सांगवीतील संगमनगर आदी ठिकाणीही रस्त्यांवर पाणी साचले आहे. 

घरांमध्ये पाणी 

सखल भागातील, नाले व नदीच्या काठावरच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. यात एमआयडीसीतील बालाजीनगर, सांगवीतील मुळानगर, पिंपरीतील संजय गांधीनगर, आंबेडकरनगर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमधील रेल्वे ट्रॅकलगतची घरे आदी ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flooded situation on road in Pimpri-Chinchwad