ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक भाऊ अभ्यंकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

अंत्यदर्शनासाठी पार्थिव सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेत ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भाऊंच्या घरी गर्दी करु नये, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी : ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर(वय ७९) यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी इंदिराबाई, कन्या, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अंत्यदर्शनासाठी पार्थिव सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेत ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भाऊंच्या घरी गर्दी करु नये, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

पंचकोषांवर आधारित शिक्षणपद्धती विकसित करण्यात भाऊंचा मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांची जाणीव व्हावी आणि त्यांनी सुजाण नागरिक व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. गणित, संस्कृत या विषयांचा हातखंडा असलेल्या भाऊ यांनी त्यांच्या अध्यापक कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत केली. त्यानंतर त्यांनी मागील ३२ वर्षे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेसाठी वाहून घेतले होते. तसेच मागील काही वर्षांपासून ते भागवत सप्ताहात प्रवचने देत असत.
 

ज्ञान प्रबोधनी परिवारावर शोककळा 
अभ्यंकर यांचा जन्म कोकणात नारिंग्रे या गावी झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते नूमवि प्रशाला, पुणे येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. कैलास वासी आप्पा पेंडसे यांच्यामुळे ते ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कार्यरत झाले. 14 वर्षे त्यांनी ज्ञान प्रबोधिनी प्रशाला येथे प्राचार्य म्हणून काम केले होते. ते काही काळ ज्ञानप्रबोधिनी, पुणेचे कार्यवाह होते. निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. अखेरपर्यंत ते ज्ञानप्रबोधिनीच्या कामात सक्रिय होते. त्यांनी मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना केली. ज्ञान प्रबोधिनी निगडी शाळेचे ते सुमारे पस्तीस वर्षे केंद्र प्रमुख होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. शिक्षण व समाज सेवेमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले त्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन सन्मान केला होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: founder teacher of Dnyan Prabodhini Nigdi Kendra Bhau Abhyankar passed away