पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी खूश; दिवाळीत सुट्यांसह मिळणार प्रोत्साहन भत्ता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

  • महापालिका कर्मचाऱ्यांना एक स्थानिक सुटी मिळून यंदाच्या दिवाळीत चार दिवस सुटी मिळणार आहे.

पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांना एक स्थानिक सुटी मिळून यंदाच्या दिवाळीत चार दिवस सुटी मिळणार आहे. 13 ते 16 नोव्हेंबर, असा सुटीचा कालावधी असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

विभागीय आयुक्तांनी यंदा तीन ऑगस्ट, एक सप्टेंबर आणि 17 ऑक्‍टोबर, अशा तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या होत्या. मात्र, 17 ऑक्‍टोबर घटस्थापनेचा दिवस शनिवार होता. पाच दिवसांच्या कामकाज आठवड्यामुळे शनिवारी (ता. 17) कार्यालयीन सुटी होती. त्यामुळे आयुक्तांनी 17 ऑक्‍टोबरची स्थानिक सुटी 13 नोव्हेंबरला जाहीर केली. या दिवशी धनत्रयोदशी आहे. 14 नोव्हेंबरला शनिवार, लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी आहे. 15 रोजी रविवार आहे आणि 16 नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याची शासकीय सुटी आहे. याच दिवशी भाऊबीजही आहे. धनत्रयोदशी व भाऊबीजेला सुटी नसते. यंदा दोन्ही सणांना सुटी मिळणार असल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

प्रोत्साहन भत्त्याचा गोडवा 
कोरोना व लॉकडाउन काळात काम केलेल्या महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी दिला. त्याचा लाभ महापालिकेच्या कायम अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह खासगी शाळेतील शिक्षक, मानधन व ठेकेदारांकडून नियुक्त कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांनाही होणार आहे. घरोघरी सर्वेक्षण, कोरोना व लॉकडाउनमधील कामांसाठी 24 मार्च ते 17 मे आणि 14 ते 23 जुलै, असे 65 दिवस नियुक्त केलेल्यांना प्रतिदिन 150 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. त्यानुसार प्रतिकर्मचारी किमान नऊ हजार 750 रुपये मिळणार आहेत. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार असल्याने गोडवा वाढणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four holidays in diwali for pimpri chinchwad municipal corporation employees