महिलांनी स्थापन केलेल्या मावळ डेअरीचे भवितव्य अंधारात!

रामदास वाडेकर
Friday, 5 February 2021

  • दीड हजार महिलांचा एकत्रित उपक्रम अडचणीत
  • ‘साथ-साथ चलो रे’ म्हणण्याची वेळ

कामशेत (ता. मावळ) : महिलांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील पहिली मावळ डेअरी या दूध उत्पादक कंपनीचे भवितव्य अंधारात आले आहे. टाटा पॉवर, एएलसी इंडिया आणि आंदर मावळातील दीड हजार महिलांनी एकत्रित येऊन २०१५ मध्ये या कंपनीची स्थापना केली आहे. सुमारे दहा कोटींची गुंतवणूक असलेली ही दुग्धजन्य निर्मितीची कंपनी सावरण्यासाठी या तिन्ही घटकांना पुढच्या काळात ‘साथ-साथ चलो रे’ म्हणण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळात दुधाला सर्वाधिक भाव देऊन महिला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सावरू पाहणाऱ्या या कंपनीची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या तिघांनाही गठबंधन तोडता येणार नाही. हे गठबंधन टिकून ठेवण्यासाठी स्थानिक महिला सभासद आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार खासदारांना साकडे घातले आहे. धुमधडाक्‍यात या डेअरीची स्थापना महिला सक्षमीकरण, महिलांना रोजगारासाठी २०१५ मध्ये झाली. ठोकळवाडी धरणग्रस्त भागातील दीड हजार महिला सभासद शेअरभागधारकांचे १२ महिलांच्या संचालक  मंडळाच्या मार्गदर्शनाखाली दुग्ध प्रकल्प सुरू झाला. सुरुवातीचे तीन वर्ष सभासद बनवणे, जमीन खरेदी व विविध परवानगी, बांधकाम, सर्व महिलांना विविध प्रशिक्षण यात गेले. मावळ डेअरीने शेतकऱ्यांनी पशुकर्ज, पशुखाद्य व पशुवैद्यकीय सेवा दिल्या. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू झाले. याच दरम्यान कोरोनाचा कालावधी चालू झाला. त्यामुळे मार्केटमध्ये अडचणी निर्माण झाल्या. दुधाचा साठा वाढला. कमी दरात दुधाची विक्री करावी लागली. त्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तरी अजूनही परिस्थिती सुधारली नाही. कंपनी व शेतकरी जगवण्यासाठी आर्थिक व मार्गदर्शनाची गरज आहे.   टाटा पॉवरकडून सहयोगाची आवश्‍यकता आहे, असे मावळ डेअरीच्या  अध्यक्षा भारती शिंदे, राधा जगताप यांनी सांगितले.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वयंपूर्ण होण्याची ही योग्य वेळ

टाटा पॉवरने प्रसिद्धीला निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, टाटा पॉवरने कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून मावळ डेअरीच्या उभारणीला पाठिंबा दिला. प्रकल्प उभारणीचा पहिल्या तीन वर्षांचा टप्पा ठरला होता. दुसऱ्या टप्प्यात या प्रकल्पाला २०२० पर्यत पाठिंबा कायम ठेवला. आता डेअरीने स्वबळावर काम करण्याची आणि स्वयंपूर्ण होण्याची ही योग्य वेळ आहे. प्रकल्प संचालकांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सहा जानेवारी २०२१ ला झालेल्या बैठकीत टाटा पॉवरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा प्रकल्प १८ ते १९ कोटींचा आहे. त्यात मावळ डेअरीचे सभासद, टाटा पॉवर, ए. एल. सी. या तिन्ही पार्टीच्या सहमतीने सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. मावळ डेअरी प्रकल्पासाठी ए. एल. सीने १०.५५ कोटी रुपये लावून मावळ डेअरीची स्थापना केली. टाटा पॉवरने ४७६ लाख देण्याचे वचन दिले होते. त्यापैकी ५५ लाख रुपये टाटा पॉवरकडून येणे बाकी आहे. टाटा पॉवरने डेअरीच्या कामासाठी पूर्ण सहकार्य केले आहे. मावळ डेअरीच्या सभासदांकडून ९० लाख रुपये प्रकल्पासाठी देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी फक्त २३ लाख रुपये जमा झाले होते. या मध्ये सभासदांची भूमिका महत्त्वाची होती. सर्वजण एकत्र होऊन एकमेकांच्या सहकार्याने पुढील पाच वर्षांपर्यंत काम करावे लागेल.
- जी. वी. कृष्णगोपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एक्‍सेस लाइवलीहुड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: future of maval dairy founded by women in maval