Pimpri : दुर्मीळ वनस्पतींना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rare plants

Pimpri : दुर्मीळ वनस्पतींना धोका

पिंपरी : गौरी आगमनाच्या पूजेसाठी मावळ भागातील कोंडिवडे, माऊ, वडेश्वर, फळणे, कुसवली, वहानगाव, बोरिवली, कामशेत, कुसूर, खांडी, लोणावळा, तळेगाव येथून मोठ्या प्रमाणात रानहळद आणि रानआले या वनस्पतींची आवक झाली आहे. एकाच वनस्पतीप्रमाणे सारख्या दिसणाऱ्या वनस्पतींची तोड केली जात असून, यामध्ये दुर्मिळ वनस्पतींची बेसुमार तोड होत असल्यामुळे वनस्पती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी पत्री आणि पूजा फूल साक्षरता अभियान व जनजाजागृतीची गरज असल्याचे मत जैववैविध्य अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

महालक्ष्मीचे खरे आसन कमळ फूल सोडून इतर दुर्मिळ फुलांची व कुमुदिनीची विक्री केली जात आहे. मूळ पुजापत्री सोडून विदेशी व इतर पत्रीची तोड करून बाजारात विक्री सुरु आहे. स्थानिक तेरडा गड्डी ३० रुपये, रानहळद एक नग ४० रुपये, गौरीची वेणी एक नग ४० रुपये, शंकरोबाची गड्डी १० रुपये प्रमाणे विक्रीला आहे. गौरीपूजनासाठी लागणारी खरी पत्री माका, डोरली, मधुमालती, बेल अर्जुन, जाई, हादगा यांचा बाजारपेठांमध्ये अभाव आहे. त्यामुळे, विदेशी वनस्पतींची भेसळ करून याची विक्री केली जात आहे.

बेलऐवजी वायवर्णा वनस्पती, शमी ऐवजी दुरंगी बाभूळ, शंकरोबा म्हणून भारंगीची विक्री केली जात आहे. द्विपक्षीय सममिती असणारी फुल शंकरोबा म्हणून वापरली जात आहेत.तेरडा या वनस्पतीबद्दल मौखिक ओवी आहे. ‘आजी गौरी तू जाशील कधी ग येशील? नदी भरलं तेरडा फुलेल मग मी येईल.’ त्यामुळे, मावळातील बऱ्याच भागात कवदरी किंवा चवेणीच्या पानांची दुरडी करून तेरड्याची फुले वाजत-गाजत घरी आणली जातात.

पाण्यामधल्या वनस्पतींमध्ये आणि पाण्यामध्ये महालक्ष्मी वास करते, अशी श्रद्धा आहे. यासाठी पर्याय म्हणून, लव्हाळ वर्गीय वनस्पतींमध्ये यांचा वापर, नागरमोथा वनस्पतींचा वापर करून तेरडा वनस्पतींची लागवड बागेमध्ये करण्यास हरकत नाही. गौराई म्हणून रानहळद आणि तेरडा विक्री केली जात असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

काही परंपरा आणि पूजापद्धती या लिखित असतात. अनेक वर्षांपासून त्या लोकसंस्कृतीचा भाग आहेत. त्याला पर्यायी वनस्पती वापरली जाते. पूजेसाठी जंगलातील सुंदर आणि आकर्षक फुले यांचा मोह स्थानिकांना टाळता येत नाही. म्हणूनच, अशा वनस्पती जंगलातून गोळा करायला बंदी घालायला हवी. त्याची ऊतिसंवर्धनमार्फत लागवड करून रोजगार उपलब्ध केला जाऊ शकतो. दुर्मीळ वनस्पतीऐवजी बाजारातील शेवंती, झेंडू, गुलाब, मोगरा आणि इतर फुलांची सजावट केली जाऊ शकते.

- प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक

Web Title: Ganeshotsav 2022 Pimpri Rare Plants Biodiversity Scholar Worried

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..