लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मावळात टोळी जेरबंद!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

वडगाव मावळ (पुणे) : लग्नाचे आमिष दाखवून मावळातील दिवड येथील एका मुंबईच्या डबेवाल्याची सुमारे सव्वा चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोना नितीन साळुंके (वय २८, रा. मांजरी, पुणे), दिगंबर जगन्नाथ भांबरे (वय २९, रा. मांजरी बुद्रूक), सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडाळे (वय २७, रा. पद्मावती कात्रज), ज्योती रवींद्र पाटील (वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली), सतीश रंगनाथ झांबरे (वय २९, रा. धायरी, पुणे), महानंदा तानाजी कासले (वय ३९, रा. काळेपडळ, हडपसर), रूपाली सुभाष बनपट्टे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी (वय ३३,  तिघेही रा. वडारगल्ली, बाबा हॉस्पिटल मागे), स्वाती धर्मा साबळे (वय २४, रा. भेकराईनगर), पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद, ता. खेड), माणिक लोटे व त्याचा एक सहकारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेश अर्जुन सावळे (वय ३२, रा. दिवड, ता. मावळ) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी सावळे याचे सोनाली खंडाळे हिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याच्याकडून वेळोवेळी दोन लाख ६० हजार रुपये रोख व दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने अशी सुमारे चार लाख दहा हजार रुपयांची रक्कम उकळली तसेच वीस हजार रुपये चोरी करून नेले. १९ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फसवणूक करणारी टोळी जेरबंद

दरम्यान, ही बनावट लग्ने लावून तरुणांची फसवणूक करणारी टोळी असून, स्थानिक गुन्हे शाखेने तिचा पर्दाफाश केला आहे. पोलिस निरीक्षक पद्‌माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती पाटील ही टोळीतील मुख्य आरोपी आहे. विवाह न जमलेल्या वयस्कर तरुणांकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन त्यांच्याशी तिच्या सानिध्यात असलेल्या इतर स्त्रियांशी संपर्क ठेवून विवाहित स्त्रियांची लग्ने लावून देत होती. विवाहित झालेली स्त्री संबंधित पुरुषाकडे सात-आठ दिवस राहिल्यानंतर ठरलेल्या कटाप्रमाणे तिला परत माहेरी जाण्यासाठी घेऊन जात होते व परत नांदविण्यास पाठवत नव्हते. लग्न झालेली स्त्री घरात कोणी नसल्याचे पाहून पैसे व दागदागिने घेऊन पळून जात होती. दिवड येथील गणेश सावळे याची अशीच फसवणूक झाली असून अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे. परंतु, इज्जतीपोटी अद्याप कोणी फिर्याद दिलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang who do fake marriage that arrested by crime branch of pune rural police in maval