'डोळे शिणले, तरी न्याय मिळेना'; गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची व्यथा  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

  • पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा कायम 

पिंपरी : गरवारे कंपनी 27 ऑगस्ट 1996 रोजी आजारी उद्योग दाखवून बंद केली. या वर्षी 25 वे वर्ष सुरू होत आहे. कंपनी बंद पडल्यानंतर 25 वर्षांत आमच्या दोन पिढ्यांची वाताहत झाली. नुकसानभरपाई वेळेत न मिळाल्याने कुटुंबाचेही हाल झाले. कधी ना कधी हक्काचे पैसे मिळतील, याकडे डोळे लावून बसलो आहोत, कुणी तरी न्याय देईल, याची वाट पाहत वृद्ध कामगारांचे डोळे शिणले आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही न्याय हक्कासाठी अनेकांच्या दारात हेलपाटे मारणाऱ्या गरवारे नायलॉन्स कंपनीच्या कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. ही भावना सांगत होते माजी कामगार प्रकाश परदेशी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देशातील नायलॉन निर्मितीचा पहिला कारखाना 1960 च्या दशकात अस्तित्वात आला. पिंपरी, अहमदनगर आणि सारोळा या युनिटच्या माध्यमातून कारखानदारीला चालना मिळाली. सुखाचा धागा निर्माण करणारी ही कंपनी 36 वर्षांनंतर डबघाईला आली. 1280 कामगार बेरोजगार झाले. त्यावेळी कामगारांचे सरासरी वय 40 ते 50 होते. अशावेळी मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न व घरातील चार ते सहा सदस्यांचे पालन पोषण कसे करावे? असे गंभीर प्रश्‍न उभा राहिला. गेल्या 24 वर्षात सुमारे 280 कामगारांचे निधन झाले. तरीही अद्याप मंजूर नुकसान भरपाई पूर्ण मिळाली नाही. केवळ वीस टक्के दिली. अद्याप 80 टक्के रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत कामगार आहेत. कायद्याने 30 दिवसांत ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणे अपेक्षित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु, केवळ वीस टक्के रक्कम देवून कामगारांच्या तोंडाला पाने पुसली. आजही 80 टक्के ग्रॅच्युइटी कधी मिळेल, या अपेक्षेवर कामगार जगत आहेत. कामगारांनी न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु कंपनी लिकविडेंटर दाद देत नाही. 24 वर्षांत व्याजासह दामदुपटीने किती होऊ शकते. एवढा पैसा लिकविडेंटरकडे आहे. त्यांचे व्याज कोण घेते? याचेही उत्तर कोणाकडे नाही. राजकारणी दखल घेत नाही, याची खंत वाटते. आजच्या घडीला अनेक कामगारांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. पैशाअभावी योग्य उपचार घेऊ शकत नाही. अशी कंपनीच्या कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. 

काही अनुत्तरीत प्रश्‍न 

- कामगारांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम गेली कुठे 
- अठरा एकरचा लिलाव केवळ 16 कोटी 40 लाखांत कसा झाला 
- 2004 व 2006 मध्ये जागेच्या लिलावाचे दर समान कसे 
- कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाची मालमत्ता ताब्यात का नाही 
- अस्तित्वातील इमारत पाडून तिचे मूल्यांकन शून्य कसे करण्यात आले 
- कामगारांची देणी दिल्याशिवाय जागा विकसनाचे प्रयत्न 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garware nylon company closed before 25 years pimpri chinchwad