रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे सिलिंडर गॅस चोरी उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Theft

प्रवाशांना घेऊन जात असताना मालवाहतूक सिलिंडरमधून गॅस चोरी होत असल्याचा संशय आला. दोन तरुण गॅस चोरी करत होते.

रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे सिलिंडर गॅस चोरी उघड

पिंपरी - प्रवाशांना घेऊन जात असताना मालवाहतूक सिलिंडरमधून गॅस चोरी होत असल्याचा संशय आला. दोन तरुण गॅस चोरी करत होते. रिक्षाचालकाने त्यांना विचारपूस केली. त्याचवेळी, तरुण हातचलाखीने गॅस चोरी करताना आढळले. नेहरूनगरमधील मोकळ्या जागेत कंपन्यांचा कचरा टाकतात. त्या ठिकाणी, एका लाल टेंपोमध्ये गॅस एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये पिन कनेक्टर पाइपच्या साहाय्याने भरताना दिसला. रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे १३ तारखेला गॅस चोरी व्हायरल व्हिडीओमधून समोर आली.

पिंपरीतील रिक्षाचालक हे दैनंदिन पिंपरी ते नेहरूनगर या ठिकाणी प्रवासी ने-आण करतात. त्याचवेळी त्यांना टेंपोमध्ये ३० ते ४० सिलिंडर दिसले. व्हिडिओ मधील माहितीप्रमाणे, गाडीचा नंबर एम एच १२ ३२३८ असा आहे. चोरी करणारे नेहरूनगरमधील श्रीभारत गॅस एजन्सीचे नाव सांगत आहेत. ‘गरीब आदमी हूं, छोड दो.’ अशी विनंती ते रिक्षाचालकाला करीत आहेत. त्यातच समोर काम करणाऱ्या महिलांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला. परंतु, त्या ठिकाणाहून चोरी करणारे काही क्षणातच गाडी सोडून पसार झाले. रिक्षामध्ये प्रवासी असल्याने रिक्षाचालक त्या ठिकाणाहून निघून गेले. सिलिंडरचे पैसे भरण्याची ऐपत नसून दुसरीकडे सर्रास गॅसची चोरी महागाईमुळे केली जात असल्याचे समोर आले आहे.

इंधन आणि गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना गॅस चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिलिंडरमधून गॅस चोरी करून वाढीव दराने विक्री केली जात आहे. जीव धोक्यात घालून एका सिलिंडर मधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरला जात आहे. त्यामुळे, अशा गॅस चोरांवर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. संबंधित गॅस एजन्सी तसेच, गॅस पुरवठा करणारे वाहनधारक यांच्यावर कडी नजर असणे गरजेचे आहे. यापूर्वी, देखील पुणे जिल्ह्यात गॅस चोरी करणारी टोळी पकडण्यात आली होती. रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी जागरूक राहावे, असे व्हायरल व्हीडीओमधून रिक्षाचालकाने संदेश दिला आहे.