लस घ्या; कोरोना हरवा | Corona Vaccination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
लस घ्या; कोरोना हरवा

लस घ्या; कोरोना हरवा

पिंपरी - कोरोना संसर्ग काही वय पाहून होत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. परंतु, त्यविरुद्ध लढण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याचा त्रास कमी होण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठांनीही प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. ते सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्यापासून इतरांना व इतरांपासून आपल्याला संसर्ग होऊ नये, यासाठी तरी सर्वांनी लस घ्यावी, असा सल्ला शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.

महापालिकेतर्फे १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण शहरात सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत ६० वर्षांवरील ६३ टक्के ज्येष्ठांनी आणि ७३ टक्के प्रौढांनी अर्थात ४५ ते ६० वर्षांतील व्यक्तींनी लस घेतली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन किंवा घराजवळ केंद्र उभारून लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांशी संपर्क साधला असता अनेकांनी भितीपोटी, रक्तदाब, मधूमेह व अन्य विकारांमुळे लस घेतली नसल्याचे जाणवले. काहींनी मात्र कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी लस हेच शस्र आहे, असे समजून लस घेतली असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.

हेही वाचा: कधी सुरू होणार शाळा

ज्येष्ठ नागरिक म्हणतात...

मे महिन्याच्या अखेरपर्यंत लशीचे दोन्ही डोस घेऊन झाले होते. आपल्यासह संपर्कातील व्यक्तींची सुरक्षा व काळजी घेण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही निरोगी राहून समाजाची सुरक्षा करता येईल. कारण, कोरोना काही वय पाहून होत नाही. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. ती लशीमुळेच वाढणार आहे. त्यामुळे लस घेणे तरुणांसह सर्वांच्यात हिताचे आहे. सरकारी यंत्रणेने सांगण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक कर्तव्य म्हणून लस घ्यावी.

- तुकारामभाऊ महाराज, सांगवी

कोरोना संसर्गाचे भय मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक वाटले. पत्नीसह माझेही दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. शिवाय, कोरोना झाल्यास उपचारासाठी खूप खर्च येतो, आठवड्यापेक्षा अधिक काळ दवाखान्यात राहावे लागते, असे ऐकूण होतो. तो खर्च पेलवणारा नाही, तसेच इतके दिवस ॲडमिट होण्यापेक्षा लस घेतलेली बरी. मी सामाजिक कार्यात सहभागी असतो, अनेक ठिकाणी जाणे होते. त्यामुळे आपल्यापासून इतरांना व इतरांपासून आपल्याला संसर्ग होऊ नये, यासाठी लस घेतली. इतरांनीही घ्यावी.

- तानाजी एकोंडे, चिंचवड

माझे वय ७२ आहे. अधून-मधून किरकोळ दुखणे सुरू असते. माझा मुलगा व सुनेने लस घेतली होती. त्यांना दोन-तीन दिवस अंगदुखीचा खूप त्रास झाला. त्या भीतीपोटी मी व माझ्या पत्नीने लस घेतली नव्हती. पण पुढील महिन्यात आम्हाला नातेवाइकांकडे अमरावतीला जायचे आहे. त्यांच्याकडे रेल्वेने जायचे असल्याने तिकिटासाठी लस घेतल्याचे सर्टिफिकेट गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात पहिला डोस घेतला. काहीही त्रास झाला नाही. आता भीती गेली आहे. पुढील महिन्यात दुसरा डोस घेणार आहे.

- प्रल्हाद ढोले, चऱ्होली

Web Title: Get Vaccinated Defeat Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :corona vaccination
go to top