सोमाटणेजवळ १ कोटींचा गोवा निर्मित मदयसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor Seized

गोवा राज्य निर्मीत विदेशी मद्याच्या बाटल्यांचे तब्बल साडेबाराशे खोके वाहतूक करणारा ट्रक सोमाटणेजवळ पकडून जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Liquor Seized : सोमाटणेजवळ १ कोटींचा गोवा निर्मित मदयसाठा जप्त

तळेगाव स्टेशन - गोवा राज्य निर्मीत आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता वैध असलेल्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचे तब्बल साडेबाराशे खोके वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणेजवळ पकडून जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क तळेगांव विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेदहाच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील, हॉटेल शांताईसमोर सापळा लावुन गोवा राज्य निर्मीती आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस वैध असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई केली.सदर ट्रक क्र. एम एच-४६ एएफ-६१३८ तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील मुद्येमाल मिळुन आला.

रियल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ४,१६४ सीलबंद बाटल्या, १८० मिलीच्या ५,७६० सीलबंद बाटल्या तसेच रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मिलीच्या ९,६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १,२६७ बॉक्स मिळुन आले. सदर जप्त मद्याची किंमत अंदाजे रुपये ८७ लाख ८९ हजार पााशे वीस रुपये (८७,८९,५२०) एवढी आहे. ट्रकसह जप्त मुद्येमालाची किंमत अंदाजे १ कोटी ५ लाख ७ हजार पाचशे वीस (१,०५,०७,५२०) इतकी आहे. आरोपी वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (२४, तांबोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि देविदास विकास भोसले (२९, खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदयाखाली त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने आरोपींना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाईत सासवड विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रविण शेलार, तळेगाव दाभाडे विभागाचे दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, प्रशांत दळवी, संजय राणे, योगेंद्र लोळे, महेश लेंडे, स्वाती भरणे, सागर धुर्वे, रवि लोखंडे, भागवत राठोड, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, तात्या शिंदे, दत्ता पिलावरे, शिवाजी गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.