दहशत माजविलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुंडांना पायी फिरवलं; निगडी ओटास्कीम गोळीबार प्रकरण

मंगेश पाडे
Saturday, 28 November 2020

ओटास्कीम येथे बुधवारी (ता.25) रात्री सव्वा अकराच्या सुमारास टोळक्‍याने गोळीबार करीत दोघांना बेदम मारहाण केली. गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला.

पिंपरी : येथील १७ जणांच्या टोळक्‍याने वर्चस्ववादातून एकावर गोळीबार करीत पालघन, कोयता, बांबू, दगड घेऊन निगडीतील ओटास्कीम परिसरात दहशत माजवली. ज्या ठिकाणी या टोळक्‍याने दहशत माजविली. त्या परिसरात पोलिसांनी या टोळक्‍यातील गुंडांना शनिवारी (ता.28) पायी फिरवलं. तपासासाठी या गुंडांना घटनास्थळी आणल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

ओटास्कीम येथे बुधवारी (ता.25) रात्री सव्वा अकराच्या सुमारास टोळक्‍याने गोळीबार करीत दोघांना बेदम मारहाण केली. गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी किरण शिवाजी खवळे (वय 28), यश अतुल कदम (वय 20), विजय शिंदे उर्फ चोरगुंड्या (वय 32), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्कीम, निगडी), रोहन चंडालीया (वय 24, रा. जाधववाडी, चिखली), निगडी मनोज हाडे (वय 25, रा. चिखलसी) यासह आणखी 10 जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेत आकाश बसवराज दोडमणी (वय 23, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) याच्यावर गोळीबार झाला असून त्याने फिर्याद दिली आहे. तर त्याचा भाऊ रवी बसवराज दोडमणी (वय 26) हा देखील जखमी झाला आहे. 

फिर्यादी व आरोपी यांच्यात परिसरावरील वर्चस्ववादातून काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. बुधवारीही त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, आरोपी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ओटास्कीम येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ आले. तिथे त्यांनी फिर्यादीचा भाऊ रवी याला दगडाने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारून जखमी केले. भावाला का मारहाण केली. हे पाहण्यासाठी फिर्यादी तेथे जात असताना आरोपी यश, रोहन, मनोज यापैकी एकाने 'तू तिथेच थांब, आता तुला गोळी घालून ठार मारतो' अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. यात फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तर त्यांचा भाऊ रवी हा देखील जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 

दरम्यान, निगडी पोलिसांनी यश कदम, विजय शिंदे, प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे यांना अटक केली असून इतर आरोपी फरारी आहेत. अटकेत असलेल्या आरोपींना पोलिसांनी शनिवारी घटनास्थळासह परिसरात फिरवलं. हत्यारे ताब्यात घेण्यासह घटना नेमकी कशी घडली, सुरूवातीचे भांडण कुठे झाले. हत्यारे कुठे ठेवली, आणखी किती आरोपी होते, आदींची माहिती आरोपींकडून घेण्यात आली. 

सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख म्हणाले, गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले होते. घटना नेमकी कशी घडली, आरोपी कुठे-कुठे व कोणत्या मार्गाने आले. गुन्ह्यातील हत्यारे कुठे ठेवली आहेत का, आदींची माहिती घेण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The goons have been turned away by the police at the place where the terror took place in Nigdi