पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

  • आयुक्तांचे रस्त्याबाबतचे भाजपने फेटाळलेले दोन प्रस्ताव सरकारकडून निलंबित
  • तीस दिवसांत भूमिका सादर करण्याचा आदेश

पिंपरी : ताथवडे जीवननगर ते बाह्यवळण मार्गाला जोडणारा रस्ता तयार करावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेसमोर ठेवला होता. तो सत्ताधारी भाजपने मतदान घेऊन फेटाळला होता. त्याबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. सरकारने आयुक्तांचा अभिप्राय मागितला होता. त्यांनी वस्तुस्थिती मांडत रस्त्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य सरकारने रस्त्याचा ठराव विखंडित करण्याच्या हेतूने निलंबित केला आहे. त्यावर तीस दिवसांत सत्ताधारी भाजपची भूमिका मागितली आहे. ती सादर न केल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे. भाजपसाठी हा मोठा दणका समजला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्‍नावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्याची प्रचिती महापालिका स्थायी समिती सभेतही आली. गेल्या दोन सभांमध्ये वाकड-ताथवडेतील रस्त्यांचे विषय गाजले. चारपैकी दोन रस्त्यांचे प्रस्ताव भाजपने फेटाळले. त्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेने आताच्या सभेत कुरघोडी केली. भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गावातील रस्त्याच्या विषयावर मतदान घ्यायला लावून प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आणि 'विकासा'ची 'चाल' चालल्याचे सांगितले. हाच मुद्दा अधोरेखित करीत राज्य सरकारने ताथवडे जीवननगर रस्त्याबाबत निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि ताथवडे-वाकड प्रभागाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. कलाटे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, एक लाखावर मते घेत चांगली लढत दिली होती. त्यांच्या प्रभागातील चार नवीन रस्त्यांचा प्रस्ताव गेल्या महिन्यातील स्थायी समिती सभेत होता. त्यातील दोन प्रस्ताव मतदानाद्वारे मंजूर झाले होते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे समर्थक सदस्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीची बाजू घेतली होती. जगताप समर्थकांनी विरोधात मतदान केले होते. त्यावेळी तहकूब केलेले दोन प्रस्ताव नंतरच्या सभेसमोर होते. त्यात जगताप व लांडगे समर्थकांनी एकमताने प्रस्ताव फेटाळून लावला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government has suspended two proposals of pimpri chinchwad municipal commissioner regarding roads