भोसरीतील मैदान, मोकळ्या जागा गवतात हरवल्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

वाढलेल्या गवतामुळे कीटकांसह डासांचे प्रमाण वाढले आहे.

भोसरी : "घराच्या पाठीमागे असलेल्या गार्डनमधील गवत वाढले आहे. नागरिकही तेथे कचरा टाकतात. वाढलेल्या गवतामुळे कीटकांसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्री झोपणे कठीण झाले आहे,'' अशी तक्रार इंद्रायणीनगरातील शुभांगी पाटोळे यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरीतील इंद्रायणीनगारातील पेठ क्रमांक एकमधील गोवर्धन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनीमधील गणेश मंदिराच्या पाठीमागे, ओमनगरीतील दत्त मंदिर परिसर, युनियन बॅंकेच्या पाठीमागील मोकळा भूखंड, वैष्णोमाता शाळेलगतच्या नाल्याला लागून असलेला भूखंड, वैष्णोमाता मार्गावरील खासगी भूखंड, पेठ क्रमांक दोनमधील इमारत क्रमांक 20, 49 व 61 जवळील मोकळे भूखंड, खासगी भूखंड क्रमांक 458 व 461, पेठ क्रमांक सातमधील यशवंतराव चव्हाण चौक परिसर, भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमधील पवना शिक्षण संस्थेजवळील नाल्यालगतचा भूखंड या भागात गवत आणि झुडपे वाढली आहेत. काही भागात ही झुडपे पाच ते सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. इमारत क्रमांक 61 च्या मागे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर महापालिकेने खेळणी बसविली आहेत. या ठिकाणी वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे मुलांना खेळण्यांसाठी जाता येत नाही. नागरिकही मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून गवत हटवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

युनियन बॅंकेच्या पाठीमागाली मोकळ्या भूखंडात वाढलेले गवत आणि झुडपांमुळे डुकरांचा वावर वाढला आहे. ही डुकरे सोसायटीत शिरतात. या ठिकाणी घोणस आणि इतर सापांचाही वावर आहे. 
- प्रतीक जराड, रहिवासी, चिंतामणी सोसायटी, इंद्रायणीनगर 

जुलैमध्ये मोकळ्या भूखंडामधील गवत काढून औषध फवारणी केली होती. मात्र, पावसामुळे पुन्हा गवत वाढले आहे. ते काढून औषध फवारणी करण्यात येईल. 
- दत्तात्रेय गायकवाड, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुटबॉल मैदानाचे विद्रुपीकरण 

इंद्रायणीनगरात संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या आतील भागात फुटबॉल मैदान आहे. हे मैदान गवत आणि झुडुपांनी व्यापले आहे. गुडघ्यापर्यंत गवत वाढल्यामुळे मैदानाचे विद्रुपीकरण झाले आहे. यामुळे खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

सद्यःस्थिती काय? 
- कीटकांसह डासांचे प्रमाणे वाढले 
- मलेरिया, चिकनगुनिया आजारांची शक्‍यता 
- सापांचे प्रमाण वाढले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grass in open spaces at bhosari indrayaninagar