पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर मुळा नदीवर हॅरिस पूल इंग्रजांनी उभारला आहे.

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताना दापोडी येथील हॅरिस पुलावरून प्रवास करावा लागतो. रहदारी वाढल्याने वारंवार वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे हॅरिस पुलाला समांतर दोन पुल उभारण्यात आले. ते दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुले केले. त्यानंतर मूळ हॅरिस पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ते पूर्ण झाले असून, हा पूल गुरुवारी वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे आठ पदरी मार्ग उपलब्ध झाला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर मुळा नदीवर हॅरिस पूल इंग्रजांनी उभारला आहे. या पुलामुळे पुणे शहरातील बोपोडी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ही उपनगरे जोडली गेली आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे, खडकी बाजार, येरवडा भागात जाता येते. तर पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीसह लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीएम ई, नवनगर विकास प्राधिकरण, देहूरोड, नाशिक महामार्ग, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपरी कॅम्प आदी भागात जाता येते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस पुलाचा लोकार्पण सोहळा आज महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेविका आशा शेंडगे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबसे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, प्रभाग अधिकारी संदीप खोत आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॅरिस पुलाची दुरुस्ती व डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीमुळे जुन्या पुलाचे आयुष्य वाढणार आहे. पुण्याकडून मुंबईच्या बाजूस जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊन कोंडी सुटणार आहे. तसेच, इंधन बचत होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harris bridge in dapodi open to vehicles