Wakad News : लाडक्या मुख्याध्यापकाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

परिपाठाला फुलनारे शाळेचे मैदान शोकसागरात बुडाले.
Principal natraj jagtap funeral
Principal natraj jagtap funeralsakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - कुणी माझा गुरु गेला, कुणी भाऊ गेला, कुणी माझा वडील गेला, माझा मित्र, माझा प्रिय सहकारी तर कोणी माझा खंबीर पाठीराखा गेला, कुणी माझा आधार हरपला म्हणून हमसून-धूमसून अश्रू ढाळत होता. एवढ्या प्रचंड जनसागरात लहानग्या विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या वृद्धाचाही तो व्यक्ती कोणीतरी खास होता हे मात्र नक्की! परिपाठाला जमणारी-फुलणारी शाळेच्या मैदानावरील गर्दी आज विद्यार्थीप्रिय शिक्षक नटराज जगताप यांच्या निधनामुळे शोक सागरात बुडाली.

हे जग सोडणाऱ्या त्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याचे सर्वाधिक दुःख होते. मात्र, गणेश नगर, थेरगाव येथील खिवंसरा पाटील शिक्षण संकुल गुरुवारी (ता. २७) त्याला अपवाद ठरले. शाळा आवारात जमलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक आजी-माजी विद्यार्थी, पालक, संघटना, सममाजसेवी संस्थातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींपैकी सर्वांनाच तो व्यक्ती जाण्याचे अतीव दुःख झाल्याची प्रचिती आली.

शाळेवर अपार जीव असल्याने त्यांचे पार्थिव विद्यार्थी व पालकांना अंतिम दर्शनासाठी शेवटचे शाळेत आणण्यात आल्याने प्रार्थनेच्या मंजुळ सुरांऐवजी हजारो विद्यार्थी-पालकांचा धाय मोकलून रडण्याचा आवाज सगळ्यांचे काळीज चिरत होता.

माझी शाळा राज्यातील पहिल्या क्रमांकाची शाळा व्हावी ह्या उद्दिष्टाने झपाटलेले विद्यार्थी-पालक प्रिय, उपक्रमशिल आदर्श शिक्षक नटराज जगताप शाळेला पोरकं करून अचानक निघून गेले. मुख्याध्यापक म्हणून २४ तासांपैकी सोळा तासांहून अधिक वेळ ते शाळेला देत. सलग पाच वर्षे एकही सुट्टी न घेणारे ते आज कायमच्या रजेवर गेले.

पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अगदी दोनच वर्षात त्यांनी शाळेचा कायापालट केला. शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी-पालक, सर्वच सहकारी शिक्षक आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना एका माळेत गोवून ठेवणारे ते अवलिया होते.

मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कामे

शाळेला आयएसओ मानांकन, भव्य पालक शिक्षक सहलीचे दरवर्षी आयोजन. मुख्याध्यापक म्हणून पहिल्या पाच वर्षांत एकही रजा नाही. लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध समाजसेवक, उद्योजक तसेच लोकसहभागातून शाळेला अनेक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, सोलर पॅनेलद्वारे वीज बचत, शाळे भोवताली हिरव्या गर्द वृक्षांचे कुंपण, स्टेम सायन्स लॅब, अत्याधुनिक संगणक कक्ष, स्मार्ट टि.व्ही क्लास, टॅबचे वाटप, सभागृह बांधणी, प्रशस्त ग्रंथालय

मराठी माध्यमाचे महत्व दिले पटवून

इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने निम्म्याहून कमी झालेला शाळेचा पट हरहुन्नरी जगताप यांनी मराठीचे महत्व पालकांना पटवून देत तीपटीने पट वाढविण्याची किमया केली. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सावरकर मंडळ, मिलेनियम सेमी कंडक्टर, मार्तंड देवस्थान, स्वाधार संस्था, आत्मजा फाउंडेशन व इतर समाजसेवक यांच्या मदतीने सातत्याने शिष्यवृत्ती मिळवून देण्यात हातखंडा, महिला पालकांसाठी बचतगटांची स्थापना, विविध व्यावसायिक कोर्सचे प्रशिक्षण. बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी पहिलीपासून अनेक स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविण्याचा आग्रह.

जगताप व त्यांच्या कार्यकाळात शाळेला मिळालेले पुरस्कार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श मुख्याध्यापक, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे विशेष पुरस्कार, गदिमा संस्कारक्षम शाळा, मुख्याध्यापक पुरस्कार, व्हीएसव्हीएसएस सोशल फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागातर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार यासह विविध संस्था संघटनांचे विसहून अधिक पुरस्कार तर शाळेला महापालिकेचा आदर्श शाळा, इंडियन टॅलेंट तर्फे बेस्ट स्कूल, तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार.

नटराज जगताप सरांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था पदाधिकारी व समाज यांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया साधलेली होती. त्यांच्याशिवाय शाळा ही कल्पनाच करवत नाही. रोजचा शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट आज मुका झालाय. न ओरडता विद्यार्थी स्वतः होऊन शांततेत सर्व काही करत होते. सरांचा सहवास गमविल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आज दिसत होता. सरांच्या रुपात असलेले शाळेचे चैतन्य, आत्मा जणू हरवल्यासारखे वाटत आहे. सरांच्या जाण्याने कधीही भरुन न होणारे नुकसान झालेले आहे. सरांच्या स्वप्नातील शाळा घडविणे हेच आम्हा सर्वांचे ध्येय असेल व सरांना ती खरी श्रद्धांजली असेल.

- स्मिता जोशी, सहशिक्षिका खिवंसरा पाटील शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com