पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय; सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

  • भिंत पडली, झाडांच्या फांद्या पडल्या, भयारी मार्गात पाणी साचले 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वारा, ढगांचा गडगडाटासह झालेल्या पावसाने सखल भागात व भुयारी मार्गांत पाणी साचले. काही सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. एका सोसायटीची संरक्षक भिंत पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. 

रविवार, सोमवारच्या पावसाचा परिणाम... 

  • रविवारी सायंकाळी व सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. स्पाइन रस्त्यावर जय गणेश साम्राज्य, पुणे-मुंबई महामार्गावर एएसएम कॉलेज परिसर, काळभोरनगर, बजाज ऑटो प्रवेशद्वार, पिंपरी कॅम्पातील डिलक्‍स चौक, पुणे-आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी फाटा आदी ठिकाणी पाणी साचले होते. 

 

  • कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भुमकर चौक, ताथवडे पवार वस्ती, पुनावळे या भुयारी मार्गांत आणि पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगर, काळभोरनगर, आकुर्डी येथील भुयारी मार्गात पाणी साचले होते. येथे खड्डेही पडल्याने वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. 

 

  • शहरात रविवारी सायंकाळी सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. मोरवाडीतील सुखवानी लॉन्स सोसायटीची संरक्षक भिंत कोसळळी होती. 

 

  • पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडी चौकालगतच्या एका पेट्रोल पंपाच्या आवारात पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील भूमिगत इंधन टाक्‍यांच्या चेंबरमध्येही पाणी साचले होते. सकाळपर्यंत पाणी काढण्याचे काम सुरू होते. 

 

  • एम्पायर इस्टेट सोसायटी परिसरातील नऊ मजली व्यापारी इमारतीच्या दुमजली पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. नाल्याचे पाणी इमारतीच्या आवारात येऊन पार्किंगमध्ये गेले होते. इमारतीची विद्युत यंत्रणाही पार्किंगमध्येच असल्याने वीजपुरवठा खंडित करून मजुरांतर्फे पाणी उपसावे लागले. 

 

  • पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील लाइफ स्टाइल सोसायटीत सांडपाणी वाहिनीतील पाणी शिरले. याच परिसरात साई उद्यानही आहे. दोन्ही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी मदत केली. 

 

  • पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते एसटी प्रशिक्षण केंद्र या दरम्यान आणि केएसबी चौक ते पिंपरी न्यायालय रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. वाहनचालकांसाठी त्या अडथळा ठरत होत्या. काही नागरिकांनी फांद्या रस्त्याच्या बाजूला केल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in pimpri chinchwad for second day on monday 21 september 2020