बेरजेच्या राजकारणाचा बादशहा

Hiranand-Aswani-and-Ajit-Pawar
Hiranand-Aswani-and-Ajit-Pawar

खरे तर मला कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. मात्र खेळाची प्रचंड आवड होती. व्हॉलिबॉल, क्रिकेट स्पर्धांमधून चांगले यशही मिळविले. चुलत बंधू हरेश आसवानी हे नगरसेवक होते. त्यांच्यामुळे मी राजकारणाकडे वळालो. त्यांच्या रूपाने केवळ एकाच व्यक्तीला सिंधी समाजाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. राष्ट्रवादी कॉॅंग्रेस पक्षाचे काम सुरू केल्यानंतर एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो. त्यांनी थेट मला नगरसेवकपदाच्या उमेदवारीचे तिकिटच दिले. विशेष म्हणजे २२०० मतांनी मी निवडूनही आलो. त्यानंतर २०१६ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही अजितदादांमुळेच मिळाले. त्यामुळे सिंधी समाजाचा शहरातील आवाज बुलंद होण्यास मदत झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची गणना केली जाते. उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून हे शहर नावारूपास आलेले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवडला हायटेक सिटी बनविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अजितदादा यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले की काम होणार असेल तर ते होईल म्हणून सांगतात आणि नसेल होणार तर तसेही स्पष्टपणे सांगतात. नियमांच्या बाहेर जाऊन काम करणे, दादांना अजिबात आवडत नाही. त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा काहीजणांना खटकत असेलही, मात्र अनेकांच्या मनाला हा स्पष्टवक्तेपणाच भावतो. 

सिंधी समाजातील अनेकांना सनद मिळालेली नाही. याबाबत मी अजितदादा यांच्याकडे प्रश्‍न मांडला. त्यांनी लगेचच जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि ज्यांना सनद मिळालेली नाही, त्यांना ती तातडीने वितरीत करण्याचा आदेश दिला. मात्र, सध्या कोरोनामुळे तीन-चार महिने हे काम थांबले आहे. लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यामुळे सिंधी समाजातील अनेकांना दिलासा मिळणार आहे. अनेक लहानसहान बाबीही अजितदादा आवर्जून लक्षात ठेवतात. माझ्या घरी ते एकदा जेवायला आले होते. मात्र, मोठेपणाचा त्यांच्यात लवलेशही जाणवला नाही. माझ्या कार्यालयाच्या उद्‌घाटनाला तसेच पिंपरी येथील साई चौकातील अंडरपासच्या उद्‌घाटनालाही ते आवर्जून आले होते. ‘सिंधी समाजाचे काही प्रश्‍न प्रलंबित असतील तर तेही सांगा. ते सोडविण्याबाबत महापालिका आयुक्तांनी मदत केली नाही तर मला थेट सांगा. मी आयुक्तांशी बोलतो,’ असे ते स्वत: आवर्जून सांगतात. अजितदादांच्या कुटुंबीयांशीही आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 

अजितदादा आणि प्रशासनावर पकड हे समीकरण अनेकांना ठाऊक झाले आहे. कडक स्वभाव, वक्तशीरपणा, कामाचा झपाटा यासारखे दादांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. कामाचा वेग आणि त्यातील अचूकतेकडे त्यांचा विशेष लक्ष असते. या दोन्ही बाबी असणारे नेते सध्या खूप कमी आहेत. त्यामध्ये अजितदादांचे नाव अग्रस्थानी आहे. विकासाच्या कामांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा व्यापक समाजहित जपण्याला दादांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. विकासकामांना ते जास्त प्राधान्य देत असल्याने बेरजेच्या राजकारणाचा बादशहा असेही त्यांना म्हटले जाते. पक्षविरहित काम करण्याचा गुण हा दादांमधील प्रगल्भता दर्शविते. राजकीय जीवनात केवळ आपणच यशाची शिखरे गाठण्याचा दादांचा स्वभाव नाही. आपल्यासमवेत खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्तेही मोठे झाले पाहिजेत, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे पक्षकार्यात सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या पदांवर विराजमान केलेले दिसते. 

धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दादांनी कधीही अन्याय केला नाही. त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर संधी उपलब्ध करून दिल्या. राजकीय जीवनात काम करणाऱ्या जुन्या जाणत्यांकडून बाळकडू घेणाऱ्यांना दादांनी कायमच सन्मानाची वागणूक दिली. त्याचबरोबर नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे काम दादांनी केले. जे योग्य आणि सत्य आहे, याची कास दादा कधीही सोडत नाहीत. मग त्याच्या परिणामांच्या विचाराला ते दुय्यम स्थान देतात.

दादांकडून आलेले काम प्रशासकीय पातळीवर त्याच पद्धतीने पुढे सरकते. त्याचे कारण ते काम वेळेत पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्याला दादांच्या रोषाला सामोरे जावे लागते. क्षेत्र कोणतेही असो, त्यातील सखोल माहिती, त्याचे नियम याचा सारासार विचार करून ती कामे पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. कोणतेही काम ते कोणाला बायपास करून करीत नाहीत. त्यांच्या अखत्यारित काम नसेल तर संबंधित मंत्र्यांशी संवाद साधून ते काम पूर्ण करण्यासाठी संबंधितांची मदत घेतात. धडाडीचे नेतृत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला दादांची ओळख आहे. केवळ बारामती, पिंपरी-चिंचवड नव्हे तर राज्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दादा नेहमी पुढाकार घेतात. अधिकाधिक विकासाची कामे करण्यासाठी दादांची धडपड असते. 

कार्यकर्ता ते नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्षपदापर्यंतचा माझा प्रवास झाला आहे. इंदिरा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचा मी माजी विद्यार्थी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण जेमतेमच झाले. मात्र, मला खेळाची विशेष आवड होती. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेली 350 बक्षिसे माझ्याकडे आजही आहेत. सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँगेसचा कार्यकर्ता होतो. मात्र मित्रांनी माझ्या नावाचा फ्लेक्‍स लावला. सुरुवातीला मी मित्रांना सांगितले, ‘अरे राजकारण म्हणजे काय मला माहिती नाही. त्यामुळे मला याच्यापासून दूर ठेवा.’ मात्र, यातूनच पुढे 2007 मध्ये अजितदादा पवार यांनी मला नगरसेवकपदाचे तिकीट दिले. अजितदादा यांनी मला पावणेतीन वर्षांसाठी उपमहापौरपदावर काम करण्याची संधी दिली.

त्यानंतरच्या निवडणुकीतही मी 3700 मतांनी निवडून आलो. या यशामध्ये माझे मित्र, कुटुंबीय यांची चांगली साथ मिळाली. आज मी जो काही आहे, त्यामागे यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण मी निवडूनच आलो नसतो तर ही पदे मला कशी मिळाली असती. पहिल्यापासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. अनेकांशी माझे वैयक्तिक संबंध चांगले होते. त्याचाही फायदा मला निवडून येण्यासाठी झाला. सर्वांशी मिळून-मिसळून काम करण्याची माझी पद्धत आहे. मी प्रत्येकाचा फोन घेतो. या सर्वांची परिणती म्हणून अजितदादा यांनी 2016 मध्ये मला स्थायी समितीचे अध्यक्षपदही दिले. यानिमित्ताने सिंधी समाजाला नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

निगडीमध्ये सर्वांत मोठा 107 मीटर उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणे, सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महिलांसाठी शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृह उभारणे अशी माझी तीन मोठी स्वप्ने होती. ही तिन्ही स्वप्ने अजितदादा यांच्यामुळे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे साई चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंडरपास तयार केला. त्यामुळे परिसरातील 60 ते 70 टक्के वाहतूक कोंडी कमी झाली. महिलांसाठी मोफत योगाचे वर्गही सुरू केले. तसेच दरवर्षी व्हॉलिबॉल, क्रिकेट आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा घेतो. महापालिकेचे बजेट आणि प्रत्येक कामाचा असलेला पाठपुरावा त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने झाला. या कामांना शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी कधीही नकार दिला नाही. त्यासाठी वेळोवेळी आवश्‍यक ते मार्गदर्शन केले. 

विकासासाठी कोठे काही कमी पडू देऊ नका, असा अजितदादा यांचा आदेशच असतो. विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी त्याच्या वॉर्डातील विकासकामे असतील तर त्याला आवश्‍यक निधी उपलब्ध करून देताे. कारण जिथे आता विरोधी पक्षाचा नगरसेवक आहे तेथे भविष्यात आमचा उमेदवारही निवडून येऊ शकतो. कारण सध्या लोकांना फक्त काम पाहिजे.

शहरातील लोकांना हे आता माहिती झाले आहे की शहरात फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच चांगला विकास करू शकते. त्यामुळे आगामी काळात महापालिकेत 100 टक्के पुन्हा आमचीच सत्ता येणार आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी शहरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

त्यानुसार शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहराच्या विविध भागात एक लाख झाडे लावली आहेत. मुलींचे प्रमाण देशात घटत आहे. त्यासाठी ज्यांना पहिली मुलगी झाली, त्यांना 25 हजार रुपये आणि दुसरी मुलगी झाली असेल तर दहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली. संपूर्ण देशात अशा प्रकारची योजना प्रथम पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविली. पोहण्याचे तलाव, रुग्णालये प्रशस्त रस्ते, क्रीडांगणे, उद्याने अशा सर्व प्रकारच्या सोयी पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्यामागे अजितदादांचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व कारणीभूत आहे. गटनेता, विरोधी पक्षनेता अशा सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. त्याचाही उपयोग झाला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com