esakal | पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी पदपथावर जाहिरात होर्डिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Hoardings and banners have been erected at many places in Pimpri Chinchwad city.jpg

लॉकडाउन जसे जसे शिथिल होत आहे, तसे तसे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरबाजीला पेव फुटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी पदपथावर जाहिरात होर्डिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी  : चिंचवड स्टेशन चौकात महापुरुषांच्या पुतळ्याच्या नजीकच असलेल्या पदपथाच्या जागेवर उंच लोखंडी होर्डिंग्ज उभे करून त्यावर जाहिराती लावल्या जात आहेत. सध्या परतीच्या पावसाचा काळ आहे. वादळ अथवा चक्रीवादळामुळे होर्डिंग चुकून पडला, त्यात काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पदपथावर होर्डिंग्सला परवानगी दिलीच कशी जाते? पादचाऱ्यांना चालण्यासाठी बनविलेल्या पदपथावर होर्डिंग्सचे अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून असा सवाल उपस्थित होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

लॉकडाउन जसे जसे शिथिल होत आहे, तसे तसे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरबाजीला पेव फुटले आहे. चिंचवड स्टेशन चौकात असणाऱ्या आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्ध पुतळ्याच्या नजीक पदपथाच्या जागेवर उंच लोखंडी होर्डिंग स्टॅंन्ड उभा केला आहे. या चौकात सिग्नल असल्याने तेथे वाहनांची नेहमीचीच वर्दळ असते. या धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. 

दोन वर्षापूर्वी पुणे जुना बाजार येथील चौकात वजनदार होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. यात जीवितहानी झाली होती तर अनेक जण जखमीही झाले होते. या मोठ्या दुर्घटनेची पुर्नरावृत्ती पिंपरी चिंचवड शहरात घडली तर याला जबाबदार कोण असणार? खुद्द आकाशचिन्ह परवाना विभागातील सेवानिवृत्त मुख्य लिपीकाकडून हे होर्डिंग्ज उभारले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असून त्यामुळेच महापालिका या माजी कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी आहे का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आकाशचिन्ह परवाना विभाग झोपेत काम करतो का? पदपथाच्या जागेवर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. घरकुल चौक येथेही अशाच प्रकारचे होर्डिंग्ज महापालिकेतील सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याने उभारले आहेत. परिणामी महापालिका यावर कारवाई करत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच निगडी येथील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली पदपथावर होर्डिंग्ज उभे करण्यात आलेले आहेत.

आकाशचिन्ह परवाना विभागाचे कार्यालय अधिक्षक ग्यानचंद भाट म्हणाले, गेल्यावर्षी ज्यांचे निविदा प्रक्रियेत नंबर लागला आहे, त्यांनी आता पदपथांव होर्डिंग्ज लावत असून त्यास महापालिकेने परवागनी दिली आहे.
 

संपादन - सुस्मिता वडतिले