esakal | Video : हडपसरमधील बेघर कुटुंबाला भोसरीच्या डॉक्टरांनी दिलं छप्पर
sakal

बोलून बातमी शोधा

Video : हडपसरमधील बेघर कुटुंबाला भोसरीच्या डॉक्टरांनी दिलं छप्पर

बेघर कुटुंबाला भोसरीतील डॉक्‍टर दांपत्यांनी आश्रय दिला, हक्काचा निवारा देवून माणुसकीचे दर्शन घडवले.

Video : हडपसरमधील बेघर कुटुंबाला भोसरीच्या डॉक्टरांनी दिलं छप्पर

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : जन्मलेल्या बाळाचे पहिल्या दिवसापासून कुठलाही दोष नसताना आयुष्य फाटक्‍या आभाळाखाली सुरू होत... नव्या जिवाच्या जन्मानंतरच्या कुठल्याही घरात साजरे होणारे पाचवीचे, बारश्‍याचे सोहळे नव्हते. एका झाडाखाली फाटक्‍या दुपट्ट्यात गुंडाळून होणं हे कदाचित नियतीचं विधीलिखित असेलही... एक दोन दिवस नाही, तर तब्बल तीन महिने.... पण ते पाहून कुठल्याही सधन किंवा क्षमता असलेल्या माणसाचे काळीज हेलावणार नसेल, तर तो माणूसच नाही... तीन महिन्याच्या वनवासानंतर या बेघर कुटुंबाला भोसरीतील डॉक्‍टर दांपत्यांनी आश्रय दिला, हक्काचा निवारा देवून माणुसकीचे दर्शन घडवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

अंजली अभिषेक वाघमारे ही महिला मूळची बारामतीची. कोरोनाच्या महामारीत हाताचे काम गेलं. त्यांना घर मालकानेही घराबाहेर काढले. आता कसं होईल, या विचारत या बेघर झालेल्या या महिलेने आपल्या आई कविता शिंदे हिच्यासोबत पुण्यातील हडपसर गाठले. कुटूंबाला वडीलांचा आधार नाही की, डोक्‍यावर छत नाही. अशातच तिथल्या रस्त्याच्या कडेलाच एका झाडाखाली आश्रय घेतला. एक नव्हे तर तब्बल तीन महिने हे कुटुंब तिथेच वास्तव्याला होते. रस्त्यावरून जाणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी सुरुवातीला बाळाच्या दुधाची, कुटुंबीयांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. पण कोरोनाच्या भीतीमुळे या कुटुंबास कुणीही निवारा द्यायला तयार नव्हते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अंजली या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. त्या काळात त्यांनी एका प्रतीक्षा नावाच्या गोंडस कन्येला जन्म दिला. पण या क्रूर जगात जन्मत:च झाडाखाली राहण्याची वेळ त्या नवजात बाळावर आली. तीन महिन्यापासून या झाडाखाली एका लहान बाळासह राहणारे या वाघमारे कुटुंबीयांचे अतोनात हाल झाले. त्यांची व्हायरल झालेली पोस्ट पाहून भोसरीतील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सचिन चिंदे व डॉ. मंजुश्री चिंदे या दांपत्याने चौकशी केली. एका घरमालकाने भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढल्याचे समजल्यावर त्यांनी ताबडतोब निवारा देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी त्या कुंटूबाला काळेवाडीत मोफत निवाऱ्यासह तीन महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तू पुरविल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या निष्पाप व निरागस बाळ आजारी पडू शकते. आम्ही दोघेही स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने आम्हाला जाणीव आहे. पावसाळी वातावरणात या लेकराचे किती हाल होतील. याची कल्पना असल्याने आपण या कुटुंबाला आपल्या काळेवाडीच्या रिकाम्या असलेल्या खोलीत पुढचे काही महिने विनाभाडे राहू द्यावा, असा विचार आला आणि त्याची लगेच अंमलबजावणी केली. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली आहे. चिमुकलीला अखेर घर मिळाल्याचा आनंद आम्हाला आहे. असेच सामाजिक भान सगळ्यांनी जपण्याची गरज आहे.

- डॉ. सचिन चिंदे