'अनलॉक'नंतरही पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल 'लॉक'च

'अनलॉक'नंतरही पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल 'लॉक'च

पिंपरी - हॉटेल(Hotel) सुरू करण्यास मालकांची तयारी आहे. नेहमीप्रमाणे चविष्ट व चमचमीत खायला खवय्येही तयार आहेत. मात्र, आचाऱ्यांसह वाढपी व अन्य कामगारांचा अभाव आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करण्यास सरकारची परवानगी मिळून दोन महिने उलटले, तरी शहरातील ४० टक्के रेस्टॉरंट व मोठे हॉटेल्स अद्याप उघडू शकलेली नाहीत. काहींनी तर अन्य व्यवसाय निवडला आहे.

शहरात दोन हजारांहून अधिक छोटे-मोठे हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. मार्चमध्ये लॉकडाउन (Lockdown) झाले आणि सर्व हॉटेल्स बंद पडली. आचाऱ्यांसह वाढपी व अन्य कामगार आपापल्या गावी निघून गेली. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबरपासून हॉटेलमध्ये बसून जेवणाची परवानगी दिली. मात्र, हॉटेलमध्ये कामगारच उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. कारण, हॉटेल कामगारांमध्ये परराज्यातील कामगारांचे प्रमाण जास्त आहे. 

अनलॉकचा निर्णय होऊन दोन महिने उलटले तरी, बहुतांश कामगार त्यांच्या गावावरून अद्याप परतलेले नाहीत. त्यांच्याअभावी अनेक रेस्टॉरंट सुरू झालेले नाहीत. परिणामी, खवय्यांना आपल्या इच्छेला आवर घालावी लागत आहे. पिंपरीतील शेल्डन वॉझ म्हणाले, ‘‘आम्ही नियमितपणे हॉटेलिंग करतो. मांसाहार आवडीचा आहे. मात्र, अद्याप हॉटेल सुरू झालेले नाहीत. त्यामुळे इच्छेला मुरळ घालावी लागत आहे.’’ 

अद्यापही हॉटेल चालकांना कमी प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउन काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध सेवा शुल्कातून सूट मिळणे आवश्‍यक आहे.
- पद्मनाभन शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन

हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचे व त्यांच्याकडील वस्तूंचे प्रवेशद्वारावर दोन वेळा स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरण केले जाते. पेमेंट ऑनलाइन घेतले जाते. त्यामुळे संपर्क टाळता येतो. युज ॲण्ड थ्रो प्लेटमध्ये जेवण दिले जाते.
- सतीश नायर, हॉटेल व्यावसायिक 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल व्यावसायिक म्हणतात...
सुशील कोटीयन म्हणाले, ‘‘आमच्याकडे वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह २२ कामगार होते. निम्म्याहून अधिक कामगार गावी गेले आहेत. त्यामुळे हॉटेल सुरू करण्यास अडचण येत आहे. शिवाय सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हॉटेल सुरू करण्याबाबत सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे. तूर्त पार्सल सेवाच सुरू ठेवली आहे.’’

सचिन काळभोर म्हणाले, ‘‘ओडिशा, पश्‍चिम बंगालसह अन्य राज्यांमधील कामगार लॉकडाऊन काळात त्यांची गावी गेले आहेत. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे हॉटेल सुरू करण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. एकटे राहणारे नोकरदार, कामगारांची मात्र जेवणाबाबत आबाळ होत होती. हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌ सुरू झाल्यानंतर ही अडचण दूर होईल, असा अंदाज होता. मात्र, कामगारांअभावी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌ उघडू न शकल्याने ‘बंद’ची समस्या कायम आहे. कमी कामगारांत हॉटेल चालविणे अशक्‍य आहे. त्यामुळे आम्ही केवळ पार्सल सेवाच सुरू ठेवली आहे.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com