अशक्तपणा आला, वजन घटलं तरी घाबरू नका; कारण... 

सुवर्णा नवले
Tuesday, 22 September 2020

सध्या कोरोनामधून 61 हजार 90 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, 15 दिवस ते एक महिनाभर बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

पिंपरी : माझा कोरोना रिपोर्ट 30 जुलैला पॉझिटिव्ह आला. सहा दिवस आधी थंडी वाजून आली. त्यानंतर खोकला सुरू झाला. होम क्वारंटाइन झाले. मात्र, योग्य उपचार गरजेचे असल्याने दवाखान्यात दाखल झाले. न्युमोनिया झाल्याचं समजलं. मुलगी व पतीही पॉझिटिव्ह होते. मुलाला दूसरीकडे पाठवून दिलं. 19 ऑगस्टपर्यंत पूर्ण उपचार घेतले. मात्र, माझं वजन 61 वरून 56 किलोवर आलं. अशक्तापणाही दीर्घकाळ जाणवला. अशावेळी मी स्वत:ला सावरलं. नातेवाइकांमध्येही एक दोघांचे मृत्यू झाल्याचं कानावर पडल्याने घाबरून गेले. अशाप्रसंगी आम्ही एकमेकांना धीर देत व्यायाम व प्राणायमवर लक्ष केंद्रित केले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या-औषधे घेऊन आता दोन किलो वजन वाढलं आहे. अशक्तपणा पूर्णपणे नाहीसा झाल्याचे पिंपरीतील गृहिणी शितल पाचपुते यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पाचपुते यांच्याप्रमाणेच अनेक जणांच्या तक्रारी आहेत. सध्या कोरोनामधून 61 हजार 90 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, 15 दिवस ते एक महिनाभर बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. कालातंराने वजनामध्येही घट होत आहे. मात्र, रुग्णांनी घाबरून न जाता स्वत:चे मन आनंदीत ठेवून चिंता रोगातून बाहेर येणं गरजेचं आहे. सध्या प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी रामबाण औषध ठरतंय ते म्हणजे सकारात्मकता. हीच सकारात्मकता टिकविण्यासाठी रुग्णांचे आचार-विचार, आहार आणि व्यायाम सुरळीत असणं गरजेचं आहे. नकारात्मक व सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. आवडत्या गोष्टींमध्ये मन गुंतवणं. मरगळ झटकून सकारात्मक दिशेने वाटचाल करणे हाच एकमेव उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानसिक तणावातून बाहेर पडणे. जेवण वेळेवर व योग्य आहार घेणे. न्युमोनिया झाल्यास फुप्फुसावर परिणाम होतो. यासाठी श्‍वासोच्छ्वासाचे व्यायाम करणे. दररोज सायकलिंग, योगा, प्राणायम यापैकी कोणताही व्यायाम सातत्याने सुरू ठेवणे. सोशल मीडियामधील कोणतीही फॉरवर्ड माहितीवर विश्‍वास ठेवणे चुकीचे आहे. याकरिता आपले नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधणे. विचारांची देवाण-घेवाण करणे. अत्यवस्थ असल्यावरही सकस आहार, पाण्याची पातळी शरीरात समप्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. 
- मनजीत संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना भूक मंदावणे, अन्नाचा वास न येणे, थकवा येणे अशा गोष्टी निदर्शनास येत आहेत. अँटिबॉडीज वाढण्यासाठी वेळ लागतो. फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठीही वेळ लागतो. विषाणूजन्य आजारांने शरिरावर हल्ला केल्यानंतर दोन ते चार आठवड्यापर्यंत शरीराची चयापचय प्रकिया मंदावते. नाडीचे ठोके कमी होतात. भीती वाढते. त्यामुळे रुग्ण त्रस्त होऊन गैरसमज करतात. याकरिता आकाशवाणीवरील प्रमाणित माहिती ऐका. वर्तमानपत्रे वाचा. आवडीचे संगीत ऐका. 
- डॉ. किशोर खिलारे, औषध विभाग प्रमुख, वायसीएम 
 

सुरुवातीला थंडी जाणवू लागल्याने 8 ऑगस्टला डॉक्‍टर मेहुणे व बहिणीला कॉल केला. कोरोनाची कोणतीही लक्षणे माझ्यात नसल्याने शांत बसलो. तरीही डॉक्‍टर मित्राचा पुन्हा सल्ला घेतला. दवाखान्यात दाखल न होता व्हॉटसऍपला व्हिटॅमिन सी आणि ऍटिबायोटिक्‍स त्यांनी दिल्या. सुरक्षितता म्हणून तात्पुरत्या स्वरुपात औषधे घेतली. तरीही अशक्तपणा जात नव्हता. शेवटी सिटी स्कॅन केलं. अँटिजेन टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली. मधुमेह असल्याने त्रास होत होता. पुन्हा थुंकीचे नमुने दिले. आईचं वय 71 असल्याने चिंता होती. तिलाही मधुमेह आहे. शेवटी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील इतर सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. दिलासा मिळाला. दवाखान्यात औषधांचे डोस सुरु होते. पण पंधरा दिवसात 12 किलो वजन घटलं. व्यवसायाने मी कॉन्ट्रक्‍टर असल्याने डोक्‍यात विचारचक्र सुरुच होतं. ताण-तणावाचाही प्रकृतीवर भयानक परिणाम होतो. हे मला उपचारादरम्यान जाणवलं.
- जयप्रकाश कदम, व्यावसायिक, कोल्हापूर 

काय कराल?

 • चिंता सोडा
 • ताणतणावातून बाहेर पडा
 • आवडीचे कार्यक्रम, वाचन व संगीत ऐका
 • कोणताही व्हायरल मेसेज वरून उपचार घेऊ नका
 • मनमानी पद्धतीने कोणतेही व्हिटॅमिन सुरु करु नका
 • सकारात्मक रहा
 • सोशल मीडियाचा योग्य वापर करा
 • गोळ्या-औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्या
 • व्यायाम व आहारावर लक्ष केंद्रित करा
 • आरोग्याशी संबंधित माहितीची शहनिशा करा
 • तेलकट आहार टाळा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to take care of weakness and weight loss