ऐकावे ते नवलच! कोरोनाने मृत्यू झालेली 'ती' झाली पुन्हा जिवंत

मंगेश पांडे 
बुधवार, 29 जुलै 2020

पौड जवळील दारवली येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला पहिली पाच वर्षांची मुलगी असून महिन्याभरापूर्वी दुसरा मुलगा झाला. सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. दहा, बारा दिवसांनी सासरच्या मंडळींनी सुनेला ताथवडे येथील तिच्या माहेरी आणून सोडले. दरम्यान, विवाहितेला कोरोनाची लागण झाल्याने तिला ताथवडेतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर ती यातून पूर्णपणे बरी झाली.

पिंपरी : मुलीच्या पाठीवर मुलगा झाल्याने सर्वांनाच आनंद झाला. बाळ व आईच्या प्रकृतीबाबत इतर नातेवाईकांशी बाळाच्या आईचे फोनवरून बोलणेही झाले. तब्येत ठीक असून सर्वांना खुशालीही कळविली. मात्र, काही दिवस उलटताच पहाटेच्या सुमारासच तिच्या पतीने सर्व नातेवाईकांना पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे सांगितले. सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. अचानक असे कसे घडले यामुळे सर्वचजण अवाक्‌ झाले. या धक्‍क्‍यातून कसेबसे सावरत नातेवाईकांनी अस्ती विसर्जनासह दशक्रिया विधीची तयारी केली. भावकीने सुतक पाळले. मात्र, पुढे काही वेगळेच घडले.
 नातेवाईकांना संशय आल्याने पोलिसात धाव घेतली. चौकशी केली असता पत्नी जीवंत असल्याचे समोर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पौड जवळील दारवली येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला पहिली पाच वर्षांची मुलगी असून महिन्याभरापूर्वी दुसरा मुलगा झाला. सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. दहा, बारा दिवसांनी सासरच्या मंडळींनी सुनेला ताथवडे येथील तिच्या माहेरी आणून सोडले. दरम्यान, विवाहितेला कोरोनाची लागण झाल्याने तिला ताथवडेतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर ती यातून पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर बाळासाठी दूध येत नसल्याने तसेच इतर त्रास होऊ लागल्याने विवाहितेला पुन्हा पिंपरीतील एका मोठया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यातूनही त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. यादरम्यान, पती त्यांच्या सोबतच असायचा. त्या बऱ्या झाल्याबाबतची सर्व नातेवाईकांना कल्पना होती. आई-वडील, सासू-सासरे, बहीण, नणंद नातेवाईकांशी फोनवर बोलणेही व्हायचे. तब्येत ठीकठाक असल्याचे त्या सांगायच्या. मात्र, अशातच तीन दिवसांपूर्वी तिच्या पतीचा त्याच्या बहिणीला भल्या पहाटे आला. या फोनमुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कोरोनामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगताच नातेवाईकांच्या छातीत अक्षरशः धस्स झाले. कोरोनामुक्त होऊन वीस दिवस उलटले, त्यानंतर दुसरी शस्त्रक्रियादेखील व्यवस्थित पार पडली. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. प्रकृती ठणठणीत असताना असे कसे घडले असा प्रश्‍न सर्वांनाच पडला. चिमुकल्या पाखरांना त्यांची आई सोडून गेल्याचे दुःख अनेकांना सहन होत नव्हते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. गावभर ही दुःखद वार्ता पसरल्याने सर्वचजण हळहळ व्यक्त करीत होते. गावी भावकीने सुतकही पाळले. जन्म देताच ती माउली चिमुकल्याला सोडून गेल्याने अनेकांचे मन हेलावून गेले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ही दुःखद घटना समजताच दोन्ही घरची मंडळी त्याला भेटण्यासाठी निघाले. जमलेल्या नातेवाईकांनी त्याला फोनवरून चौकशी केली असता आपण व दवाखान्याचे कर्मचारी मिळून पत्नीवर येरवडा येथे अंत्यसंस्कार करून आल्याचे सांगत आता काळेवाडी फाट्यावर त्याने सांगितले. दरम्यान, नातेवाईक त्याला भेटण्यासाठी काळेवाडी फाट्यावर गेले. त्यांना पाहताच 'माझा संसार उघडा पडला, मुलं उघडी पडली' असे तो उद्गारला. त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. दरम्यान, अस्ती विसर्जन व दशक्रियेच्या कार्यक्रमासह मुलांच्या संगोपणाचे पुढे काय करायचे यासाठी नातेवाईक तेथे एकत्र जमले. 

मात्र, त्यावेळी तो कुणालाही त्याच्या डांगे चौकातील फ्लॅटवर चला असा म्हणाला नाही, रस्त्यावरच चर्चा करीत होता. हाकेच्या अंतरावरच त्याचा फ्लॅट असतानाही घरी न नेल्याने त्याची ही भूमिका त्याच्या बहिणीला संशयास्पद वाटत होती. तरीही चर्चा झाल्यावर सर्व आपआपल्या घरी गेले. तर त्या विवाहितेचा पती त्याच्या ऑफिसवर गेला. अखेर त्याच्या या संशयास्पद भूमिकेबाबत त्याच्या बहिणीला ऑफिसमधूनही काही माहिती समजली. त्यानंतर तिने त्याच्या सासू सासऱ्याना 'आमची मुलगी कुठे आहे हे व्यवस्थित सांग' असा जाब त्यांच्या जावयाला विचारायला लावला. तरीही तो त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यानंतर सासू सासऱ्यांनी पोलिसात धाव घेत घडलेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली असता त्याला चौकीत बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या भाषेत विचारपूस केल्यानंतर त्याने अखेर तोंड उघडले. यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

मावळात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार; आज २७ नवे पॉझिटिव्ह

आपली पत्नी सुखरूप असून सध्या डांगे चौकीतील फ्लॅटवर असल्याचे सांगितले. मी व माझी पत्नी रूग्णालयात असताना कुणीही भेटायला येत नव्हते सर्वांनीच आमच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही एकटे पडलो, अशा नातेवाईकांचा उपयोग तरी काय, म्हणूनच आपण सर्वांना पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे सांगितल्याचे त्याने कबूल केले. मात्र, यामुळे कोरोनामुळे मृत घोषित केलेली ती महिला पुन्हा जिवंत झाल्याचा अजब प्रकार ताथवडे येथे उघडकीस आला. 

'ती' घरी सुखरूप 
सर्व उपचारानंतर विवाहितेला काही दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले आहे. तिची प्रकृतीही ठणठणीत आहे. ही सर्व घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही कुटुंबातील मंडळींचा जीव भांड्यात पडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband Declare his Alive wife dead due to corona

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: