कोटींच्या वाहनांचे लाखोंमध्ये नुकसान; पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना

कोटींच्या वाहनांचे लाखोंमध्ये नुकसान; पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना

पिंपरी : जाता-जाता खळखट्याक आवाज करून सहजरित्या वाहन फोडले जाते. काही जण दहशत माजविण्यासाठी, तर काही जण पूर्ववैमनस्यातून वाहनांना लक्ष्य करतात. मात्र, लाखमोलाचे वाहन डोळ्यांपुढे उद्ध्वस्त झालेले पाहून वाहन मालकाचे मन सुन्न होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या घटनांची तर मालिकाच सुरू आहे. मागील दोन महिन्यांत घडलेल्या सात घटनांमध्ये साडेसहा कोटी रुपये किंमतीच्या 66 वाहनांचे तब्बल 30 लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन लॉकडाउनच्या कालावधीत अनेक जण आर्थिक चणचण असताना टोळक्‍याकडून लाखमोलाच्या मोटारी 'लक्ष्य' केल्या जात असल्याने शहरवासीय भीतीच्या सावटाखाली आहेत. 

खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांवरील हल्ले या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहर हादरले असताना आता वारंवार घडणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात मागील दोन महिन्यांत झालेल्या 66 वाहनांच्या तोडफोडीत दहा लाखापुढील 40 वाहने असून, दहा लाखांच्या आतील किंमतीची 26 वाहनांचा समावेश आहे. वाहनाला साधे खरचटले तरी वाहनावर जिवापाड प्रेम करणारे वाहनमालक पैशांची तजवीज करून दुरुस्ती करून घेतात. मात्र, काहीही कारण नसताना तोडफोडीच्या घटनांमध्ये वाहन लक्ष्य केले जात असून वाहन पार्किंगमध्ये उभे करावे की नाही अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पहायला मिळत आहे. 

वादातून वाहने होताहेत लक्ष्य 

पूर्ववैमनस्यातून भांडणे झाली अथवा कौटुंबिक वादातून घटना घडली, तरी अनेकदा रस्त्यावरील वाहनांना लक्ष्य केले जाते. टोळक्‍यांकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे. मात्र, यामध्ये सामान्य नागरिकांनी पै-पै जमवून घेतलेल्या लाखो रुपये किंमतीच्या वाहनाचे नाहक नुकसान होत आहे. 

आर्थिक चणचण त्यात नुकसान 

लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प असून, अनेकांना आर्थिक चणचण भासत आहे. अनेकांची वाहनेही मागील तीन महिन्यांपासून दारातच उभी आहेत. त्यातच वाहनाचे नुकसान झाल्यास त्याची दुरुस्ती करायची कशी, असा अनेकांपुढे प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

साधारण इतके होते नुकसान 

दहा लाखाच्या पुढील वाहन असल्यास त्याची एखादी काच तसेच हेडलाईट फुटली तरी किमान तीस ते चाळीस हजाराचे नुकसान होते. तर 
दहा लाखाच्या आतील एका वाहनाचे किमान पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान होते. 

वाहनांवर असते जीवापाड प्रेम 

अनेक जणांनी पै-पै जमवून बॅंकेचे कर्ज काढून वाहन घेतलेले असते. मात्र, याच वाहनाची विनाकारण तोडफोड झाल्यास वाहनाला जितक्‍या वेदना होतात तितक्‍याच वेदना वाहनाच्या मालकाही झालेल्या असतात. मात्र, याचे कसलेही गांभीर्य वाहन तोडफोड करणाऱ्यांना नसते. 

...तरच मिळते भरपाई 

वाहन तोडफोड झाल्यास 427 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित मालकाला भरपाई मिळते. तर अनेक प्रकरणांमध्ये भरपाईदेखील मिळत नाही. मात्र, अनेक गुन्ह्यात आरोपीच निष्पन्न होत नाही. तसेच विमा कंपनींचे देखील वेगवेगळे नियम व अटी आहेत. त्यामध्ये सर्व घटकांमध्ये संबंधित घटना बसत असेल तरच विमा मिळतो. 

दहा लाखांपुढील आलिशान मोटार 

  • समोरील काच - सुमारे 7 हजार 
  • खिडकीची काच - 2 हजार 
  • एक डॅमेज काढणे - 4 हजार 
  • एक हेड लाईट - सुमारे दहा हजार 

दहा लाखाच्या आतील गाड्या 

  • समोरील काच- सुमारे 4 हजार 
  • खिडकीची काच - दीड ते दोन हजार 
  • एक हेड लाईट - सुमारे दोन हजार 

मॅटेलिक कलरचा खर्च अधिक 

एक डेंटिंगसाठी सिल्व्हर, ग्रे आदी कलरला अडीच ते तीन हजार रुपये खर्च तर व्हाईट कलरला दीड ते दोन हजार 

26 मे - मागील दोन महिन्यांतील वाहन तोडफोडीच्या घटना  

  • 11 जून - कासारवाडीत किरकोळ वादातून तीन वाहनांची तोडफोड 
  • 12 जून - भोसरीतील दिघी रोड येथे टोळक्‍याकडून आठ वाहनांची तोडफोड
  • 14 जून - पिंपरीतील कैलासनगर येथे चौघांकडून आठ वाहनांची तोडफोड
  • 23 जून - पिंपळे निलख येथील शारदा कॉलनी येथे टोळक्‍याकडून वीस वाहनांची तोडफोड
  • 9 जुलै - पिंपरीत दोन रिक्षांची तोडफोड 
  • 23 जुलै - तीन वाहनांची तोडफोड 
  • सांगवीत 22 वाहनांची तोडफोड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com