पिंपरी : वायसीएममधील डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात वाढ...किती झाली बघा 

टीम ई-सकाळ
Thursday, 18 June 2020

वायसीएम रुग्णालय व पदव्यूत्तर संस्थेतील 33 निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतन वाढीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पिंपरी : वायसीएम रुग्णालय व पदव्यूत्तर संस्थेतील 33 निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतन वाढीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रथम वर्षाच्या डॉक्‍टरांना दरमहा 49 हजार 551 आणि द्वितीय वर्षाच्या डॉक्‍टरांना 50 हजार 112 रुपये मिळणार आहे. गेल्या एप्रिलपासूनचा फरकही त्यांना मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

महापालिकेने वायसीएम रुग्णालयात एक ऑगस्ट 2018 पासून 33 निवासी डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. त्यांना दरमहा विद्यावेतन दिले जाते. त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चातून अर्थसंकल्पाच्या "विद्यावेतन' लेखाशीर्षातून एक कोटी रुपये घेतले जाणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगरमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. सध्या ते कोरोनासाठी राखीव ठेवले आहे. साडेसातशे बेडची सुविधा असलेल्या या रुग्णालयात दोन वर्षांपासून पदव्यूत्तर वर्ग सुरू केले आहेत. त्यात 33 डॉक्‍टर असून त्यांना दरमहा विद्यावेतन दिले जात आहे. त्यांच्या विद्यावेतन वाढीची मागणी वर्षांपासूनची होती. याबाबत त्यांनी आंदोलनही केले आहे. अखेर त्यांच्या विद्यावेतनात आता वाढ करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जानेवारी 2016 च्या निर्णयानुसार सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये व आयुर्वेदिक महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. या डॉक्‍टरांनाच निवासी कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्‍टर असे संबोधले जाते. विद्यावेतनासह त्यांना महागाई भत्ताही देण्यात यावा, असे सरकारच्या निर्णयात म्हटलेले आहे. त्यानुसार वायसीएममधील निवासी डॉक्‍टरांनासुद्धा सुधारित विद्यावेतन महागाई भत्ता व फरकासह दिले जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सध्या वायसीएममधील निवासी डॉक्‍टरांना सरासरी 24 हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जात आहे. त्यात आता जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यात विशेष वेतन व वाढ 12 हजार 525 रुपये आहे. प्रथम वर्षासाठी महागाई भत्त्याची रक्कम 27 हजार 126 व वेतन नऊ हजार 900 रुपये आणि द्वितीय वर्षासाठी महागाई भत्ता 27 हजार 537 व वेतन 10 हजार 50 रुपये असे अनुक्रमे 49 हजार 551 आणि 50 हजार 112 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the scholarship of doctors in ycm hospital