भोसरीतील नागरिकांना मिळणार अर्बन स्ट्रीट सेवा रस्त्यांचा अनुभव

संजय बेंडे
Tuesday, 8 September 2020

  • बीआरटीएसद्वारे कामाला सुरुवात

भोसरी : महापालिकेद्वारे बीआरटीएस विभागाअंतर्गत येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्याच्या पदपथाची रुंदी वाढविण्यात येत आहे. हे सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाइनद्वारे विकसित करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी पार्किंगसह पदपथावर अतिक्रमण होऊ नये, याचे नियोजन केले जाणार आहे, असा दावा बीआरटीएसद्वारे करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील आळंदी रस्ता, चांदणी चौक ते भोसरी लांडेवाडी चौक, दोन्ही बाजूकडील सेवा रस्ता आदी भागांवर विविध वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पदपथावर टपऱ्याही उभारल्या आहेत. असे असताना येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्यालगतचे पदपथ विकसित करण्यात येत आहेत. या पदपथाची रुंदी साडेचार ते आठ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या पदपथाचे व्यवस्थित नियोजन न केल्यास विक्रेत्यांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. चांदणी चौकात संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. पदपथामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्यास या ठिकाणी आणखी कोंडी होण्याची शक्‍यता नागरिकांनी बोलून दाखविली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दीड किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर साडेसात मीटर रुंदीचे दोन लेन वाहनांसाठी सोडण्यात आले आहेत. सेवा रस्त्याची रुंदी काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी अधिक आहे. त्यामुळे साडेसात मीटरचे दोन लेन सोडून उर्वरित रस्त्यावर पदपथ, पार्किंग, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेद्वारे 31 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

पदपथावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी पदपथाच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळी लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पदपथावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठीही लक्ष पुरविले जाणार आहे. हा सेवा रस्ता विकसित झाल्यावर पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला पार्किंग आणि नो-पार्किंगचे नियोजन करण्यात येणार आहे. 
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, बीआरटीएस 

दृष्टीक्षेपातील पदपथ 

  • गतिनियंत्रणासाठी कोबाल्ट स्टोन लावणार 
  • नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पदपथावर रेलिंग लावणार 
  • सायकल ट्रॅकची उभारणी करणार 
  • फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजित क्षेत्र विकसित करणार 
  • विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था 
  • वृक्षारोपण करून पदपथ सुरक्षित करणार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase the width of foothpaths in bhosari