Pavana River : पवना नदीपात्रात कासारवाडीलगत भराव; खासगी जागेच्या मालकाचे कृत्य

कासारवाडी येथील पवना नदी पात्राशेजारी खासगी जागा मालकाकडून भराव टाकण्यात आल्‍याने यापूर्वी महापालिकेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.
Inundation of Pavana riverbed
Inundation of Pavana riverbedsakal

पिंपरी - कासारवाडी येथील पवना नदी पात्राशेजारी खासगी जागा मालकाकडून भराव टाकण्यात आल्‍याने यापूर्वी महापालिकेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, त्यानंतरही संबंधित जागा मालकाकडून नदीपात्रालगत दगड, धोंडे टाकून भराव टाकण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊ लागले आहे.

शहर परिसरामधून पवना नदी सुमारे २५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. किवळे, रावेत येथून थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी आणि दापोडी या भागांतून ही नदी जाते. सध्या शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे.

सातत्याने नदीपात्रात मैलामिश्रित सांडपाणी आणि रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी मिसळत आहे. त्‍यामुळे, नदीची गटारगंगा झाली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे भराव टाकून नदीचे पात्र अरुंद करण्याचे काम बेधडकपणे सुरू आहे. त्यामुळे, महापालिका हद्दीत पवना नदी पात्राचे अस्तित्व जागोजागी संपुष्टात येऊ लागले आहे.

पात्रालगत अनेक स्थानिकांच्या जागा आहे. त्या जागा लाल रेषा, निळ्या रेषा आणि पूर रेषेत येत आहेत. काही ठिकाणी स्थानिक जागा मालकांकडून थेट नदीतच मातीचा भराव, राडारोडा टाकून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे.

कासारवाडी, पिंपळे गुरव येथील पवना नदी पात्रालगत देखील तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी माती आणि राडारोडा टाकून नदीची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून होऊ लागला आहे. महापालिकेच्‍या पर्यावरण विभागाचा डोळा चुकवून हे काम केले जात आहे. यापूर्वी याच कामाबाबत तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या.

त्‍यावेळी महापालिकेच्‍या पर्यावरण विभागाच्‍यावतीने केवळ नोटिसा बजावण्याची कारवार्ई करण्यात आली होती. मात्र, कायमस्‍वरूपी काम बंद करण्याबाबत संबंधित विभागाने कारवाई केली नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून पुन्‍हा या ठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू आहे.

नदी पात्रालगत असलेल्या खासगी जागा मालकाची यापूर्वीही तक्रार प्राप्‍त झाली होती. त्‍यावेळी जागा मालकाला नोटिस देऊन तिथे उभ्या असलेल्‍या खासगी ट्रॅव्‍हल्‍सवर कायदेशीर कारवाई केली होती. आताही तसाच प्रकार दिसत आहे. महापालिकेचे अधिकारी पाठवून पाहणी करून कारवाई करू. नदीपात्राची जागा निश्‍चित आहे. अतिक्रमण झाले असल्‍यास कारवाई केली जाईल.

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

पुराचे कारण ठरल्‍यास जबाबदारी कोणाची?

शहरातील नदीपात्रात अतिक्रमणे होऊन ते अरुंद झाल्‍याने पावसाळ्यात नागरी वस्‍तीत नदीचे पाणी शिरत आहे. नदीपात्रात भरावही टाकला जात असल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी परिस्‍थिती उद्‌भवल्‍यास त्‍याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com