जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय.

पिंपरी : लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. त्यात आटीयन्सना नोकरी जाण्याचा व पगार कपातीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडलीय. त्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या सतावू लागलीय. याआधी चार टक्‍यांपर्यंत असलेलं हे प्रमाण लॉकडाउनमध्ये 15 टक्‍यांपर्यंत गेलंय. सध्याची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकेल, अशी शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तवलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयटीयन्सने आतापर्यंत कधीही अनुभवली नसेल, अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलीय. मात्र, दररोजच वेगवेगळ्या ताण तणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होताना दिसतोय. 

चिंतारोग वाढण्याची कारणे काय? 

सध्या निर्माण झालेल्या स्थितीमध्ये नोकरी गमावल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणाच्या स्थितीमुळे चिंतारोगामध्ये भर पडत आहे. सुरुवातीला नोकरी गेल्याचे समजल्यानंतर अनेकांना तो धक्‍का मान्यच होत नाही. त्यानंतर काही जणांमध्ये रागाची अवस्था निर्माण होते, तर काहीजण अखेरीस परिस्थिती मान्य करून नव्या वाटा शोधू लागतात. चिंतारोगांमुळे प्रामुख्याने निद्रानाश, सतत चिंता, मनामध्ये कायम असुरक्षितेतची भावना, असे प्रकार दिसून येतात. या ताणामुळे मानसिक बैठक स्थिर राहत नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार उद्‌भवू शकतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन 

नोकरी गेल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणासंदर्भात आयटीयन्सना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून सुरू करण्यात आलाय. मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हिडिओ तयार करून ते व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, असं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मानसिक स्वास्थ कसे राखाल...

  • मानसिक स्वास्थ बिघडू न देता, ते चांगले कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा. 
  • खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. 
  • खर्च कमी करण्याची सवय लावा. 
  • योगा, मेडिटेशन, कौन्सिलिंग याचा आधार घ्या आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा 

लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एरवी चार टक्‍यांपर्यंत असणारे, हे प्रमाण दोन महिन्यांमध्ये वाढले आहे. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण 10 ते 15 टक्‍यांपर्यंत, तर 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण आठ ते दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती अशीच कायम राहिली, तर यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक स्वास्थ ठिक ठेवण्यासाठी ही मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याबरोबरच फॅमिली डॉक्‍टर, फिजिशिअयन यांचा सल्ला घेत आहेत. 

- डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, भारतीय मानसोपचार संघटना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: it employees got tension due to job lost pune it park