जुनी सांगवीतील गॅस शवदाहिनीत अंत्यविधीसाठी खोळंबा

 रमेश मोरे
Wednesday, 11 November 2020

सांगवी येथील गॅस शवदाहिनी सकाळपासून किमान तीन तास लाईट नसल्याने व त्यातच जनरेटरची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने बंद ठेवावी लागली. काही तासात पुन्हा लाईट येताच शवदाहिनी पुन्हा सुरु झाली.

जुनी सांगवी : माझ्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी सकाळी जुनी सांगवी शवदाहिनी येथे फोन केला. मात्र येथील लाईट व जनरेटर बंद असल्याचे कळाले, नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मग पर्यायी मार्ग शोधावा लागला. असे नवी सांगवी आदर्श नगर येथील रवी पुरोहित यांनी सांगितले.

बुधवार (ता.११) जुनी सांगवी येथील गॅस शवदाहिनी सकाळपासून किमान तीन तास लाईट नसल्याने व त्यातच जनरेटरची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने बंद ठेवावी लागली. काही तासात पुन्हा लाईट येताच शवदाहिनी पुन्हा सुरु झाली. गेल्या सहा महिन्यात सांगवी व शहर परिसरातून कोविड सह इतर मयता़ंचे अंत्यविधी येथे झाले. नेमकी गेली सहा महिन्यात बुधवारी तांत्रिक अडचण आल्याने नागरीकांची तारांबळ उडाली.

सकाळी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना पर्याय शोधावे लागले. दुपारी पुन्हा दाहिनी पुर्ववत सुरु करण्यात आली. मात्र तरीही अशा काळात येथील देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

पालिका येथील शवदाहिनी ठेकेदारामार्फत चालवते. या काळात देखभाल दुरुस्तीची कामे जबाबदारीने करायला हवीत.
-प्रशांत शितोळे, शहर कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस.

लाईट गेल्यामुळे येथील जनरेटरची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. दोन्ही पर्याय बंद असल्याने अडचण आली. बॅटरी दुरुस्तीसाठी दिली आहे. लाईट आल्यावर दुपारी दाहिनी सुरू करण्यात आली. 
-श्याम सुंदर बनसोडे, अभियंता- विद्युत विभाग.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It has taken time for the cremation as the lights have gone out at Sangvi Gas crematorium