'कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीवर ठपका ठेवणं हा डॉक्टरांचा अवमानच'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

- महापालिका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची भावना

पिंपरी : कोरोना काळात कोरोना रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्य सरकारचे निर्देश लक्षात घेता, हा विषय महापालिका सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. मात्र, या विषयावर चर्चा सुरू असताना माजी महापौर व माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल यांनी मात्र, डॉक्टरांच्या कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीवर ठपका ठेवत या विषयाला विरोध दर्शविला. तसेच डॉक्टर भरतीत लाखो रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचे बेछूट आरोप करत डॉक्टरांच्या अस्मितेवर गदा आणून अवमान केला आहे, अशी भावना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नव्याने पीजी इन्स्टिट्यूट स्थापन केले आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी एकूण १०४ जागा शासनाकडून मंजूर केलेल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने या जागांसाठी जाहिरात देऊन उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यापैकी ७४ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यातून ३२ डॉक्टर हे सद्य:स्थित वायसीएम रुग्णालयात सेवा देत आहेत. वायसीएम रुग्णालयातील पीजी इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांच्या कायमस्वरुपी नियुक्तीसाठी काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीस ठेवण्यात आला होता.

यामध्ये तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टर, कोरोना रुग्णासाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, सुरक्षानिरिक्षक, रुग्णवाहिका वाहनचालक व वर्ग चारचे कर्मचारी तसेच, घंटागाडी कर्मचारी यांना मनपा सेवेत कायम करण्याची उपसुचनादेखील मांडण्यात आली होती, असे सांगून ढाके म्हणाले, "वायसीएम रुग्णालयातील पीजीआयसाठी केलेल्या डॉक्टर भरतीसंदर्भात आयुक्तांच्या दालनामध्ये सर्व गटनेते, पदाधिकारी व प्रमुख नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत सर्व भरती प्रक्रिया संदर्भात चर्चा झाली होती. डॉक्टर भरतीची गरज विचारात घेऊन विषय मंजूर करण्यावर एकमतदेखिल झाले होते, असे असतानाही स्वत:ची दुकानदारी बंद होणार म्हणून बहल यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण न ठेवता थेट डॉक्टरांवर व त्यांच्या कामगिरीवर आरोप केले आहेत." 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुठल्याही विषयाची योग्य ती माहिती न घेता बोलायचे म्हणून बोलावे, हे महापौर व विरोधी पक्षनेते पद भुषविलेल्या बहल यांना न शोभणारे आहे. पीजी इन्स्टिट्यूटमुळे शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे. ही शहरासाठी गौरवाची बाब असून, पुढील काळात अनेक उच्चशिक्षित डॉक्टर निर्मिती संस्था म्हणून याकडे पाहिले जाणार आहे. मुद्दा फक्त इतकाच, की भाजपला हे श्रेय जाईल या हेतुनेच डॉक्टरांवर बेछूट आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचा खटाटोप त्यांच्याकडून सुरु असून हे शहराचे दुर्दैव आहे, असे मतही ढाके यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's an insult to doctor to best performance of corona said namdev dhake in pimpri chinchwad