पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना मिळणार उद्यापासून 'जम्बो फॅसिलिटी' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

  • मगर स्टेडियम आवारातील रुग्णालय कार्यान्वित होणार 

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयांतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर आठशे बेडची क्षमता असलेले जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बुधवारपासून (ता. 26) ते कार्यान्वित होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी जम्बो फॅसिलिटी रुग्णालये उभारण्यात येत आहेत. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर, इंद्रायणीनगरमधील बालनगरी आणि नेहरूनगरमधील मगर स्टेडियमच्या आवारात ही जम्बो रुग्णालये उभारली जात आहेत. त्यातील मगर स्टेडियमवरील रुग्णालयाची बेड क्षमता सर्वाधिक आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांच्या गंभीर, लक्षणे असलेली व लक्षणे नसलेली अशा लक्षणांनुसार वर्गवारी केली जात आहे. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 80 टक्के आहे. सध्या रुग्णालयांसह अकरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहे. घरी स्वतंत्र खोलीची व्यवस्था असलेल्या रुग्णांना होम आयसोलेटची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून "जम्बो फॅसिलिटी' रुग्णालये उभारण्यात येत आहेत. याचा पन्नास टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. सहा महिने कालावधीसाठी ही सुविधा असेल. 

अशा असतील सुविधा 

जनरल बेड, ऑक्‍सिजन बेड, आयसीयू (अतिदक्षता विभाग), व्हेंटिलेटर सुविधा येथे असेल. तसेच, रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा असून, सकल आहार, शुद्ध पाणीही दिले जाणार आहे. मंगळवारी (ता. 25) "सकाळ' प्रतिनिधीने रुग्णालयाची पाहणी केली असून, उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसले. आयसीयू, एचडीयू, ऑक्‍सिजन बेडसह जनरल बेडची व्यवस्था केली आहे. ऑक्‍सिजन वाहिन्यांची तपासणी व जोडणी केली जात होती. आपत्कालिन स्थितीसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम झाले आहे. प्रत्येक विभागात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. स्ट्रेचरसह व्हिलचेअरची सुविधा आहे. 

जम्बो फॅसिलिटी रुग्णालये 

  • ऑटोक्‍लस्टर : 200 
  • मगर स्टेडियम : 800 
  • बालनगरी पिंपरी : 425 

मगर स्टेडियमवरील रुग्णालय 

  • एकूण बेड : 800 
  • ऑक्‍सिजन बेड : 600 
  • आयसीयू बेड : 200 

दृष्टिक्षेपात आयसीयू बेड 

  • आयसीयू : 60 
  • एचडीयू बेड : 140 
  • व्हेंटिलेटर : 30 

चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर, नेहरूनगर येथील मगर स्टेडियम व इंद्रायणी भागातील बालनगरी या ठिकाणी "जम्बो फॅसिलिटी' रुग्णालये सुरू करीत आहोत. सर्व मिळून बेड क्षमता एक हजार 425 आहे. अत्याधुनिक उपचाराची सुविधा आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jumbo facility hospital will be starts in pimpri chinchwad from wednesday 26 august 2020